रत्नागिरी:- काही कारण नसताना घरात प्रवेश करुन मारहाण व घराच्या कंपाऊंडचे नुकसान केले. या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश ज्ञानेश्वर चव्हाण व उपेश ज्ञानेश्वर चव्हाण (दोन्ही रा. जाकिमिऱ्या, शिवलकरवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना रविवारी (ता. २१) रात्री साडेअकराच्या सुमारास आलावा-जाकिमिऱ्या-तळेकरवाडी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला व तिचे पती दोघे मुले रात्री घरी आली नाहीत म्हणून दरवाजा न लावता लोटून झोपले होते. त्यावेळी फिर्यादी महिलेच्या मुलांचे संशयित मित्र यांनी परवानगी शिवाय घरात प्रवेश करुन त्यांच्या हातात असलेल्या लाकडी दांडक्यानी घराच्या खिडकीच्या काचा फोडून व फिर्यादी यांच्या मुलाला मिळालेली बक्षिसे खाली आपटली तसेच चिऱ्यांचे कंपाऊंड तोडून नुकसान केले. तसेच फिर्यांदी यांना शिवीगाळ करुन हाताच्या थापटाने मारहाण केली. या प्रकरणी फिर्यादी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.