अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी संशयितास पोलिस कोठडी

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा येथे गांजा ( अमंली ) पदार्थ प्रकरणातील संशयिताला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आरोपीला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

अजय कारेकर ( वय २२, रा. पडवेकर कॉलनी, उद्यमनगर रत्नागिरी ) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी ( ता . १५ ) रात्री पावणेनऊच्या सुमारास मिरकरवाडा – पांढरा समुद्र येथे निदर्शनास आली होती. पांढरा समुद्र येथे गांजा विक्री होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत संशयिताकडे १७ हजार ७५० रुपयांच्या ७० छोट्या – छोट्या पिशव्यांमध्ये भरलेला अंमली पदार्थ सापडला होता. 

शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन शनिवारीच अटक केली होती. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. मंगळवारी  संशयिताला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.