40 टक्के पीक वाया, बागायतदार हवालदिल
रत्नागिरी:- ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा रत्नागिरी हापूसला बसला आहे. यंदा हंगाम लांबल्यामुळे शेवटच्या टप्प्यात आंबा अधिक तयार होण्याची शक्यता असतानाच आलेल्या वादळासह मुसळधार पावसाने झाडावरील आंबा खाली पडला. सुमारे चाळीस टक्के पिक वाया गेले असून बागायतदारांचे करोडोचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हंगामाच्या सुरवातीलाच वातावरणातील बदलांचा परिणाम झाला. पहिल्या टप्प्यात उत्पादन आलेच नाही. खर्या अर्थाने 10 एप्रिलपासून आंबा बाजारात दिसू लागला होता. गेल्या पंधरा दिवसात वाशी बाजारातही दिवसाला 30 हजार पेटी दाखल होत होती. मोहोर उशिराने आल्याने 15 ते 31 मे या कालावधीत उत्पादन हाती येईल अशी शक्यता होती; मात्र अचानक अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळाने बागायतदारांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फेरले. रविवारी पहाटेपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळाने धुमाकुळ घातला. दुपारी हे वादळ रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले. गोल गोल फिरणार्या ताशी 55 किलोमीटर वेगवान वार्यांनी हापूसच्या बागाच्या बागा पिळवटून टाकल्या. झाडावरील आंबे टपाटप जमिनीवर कोसळत होते. काढणीयोग्य आंब्यापासुन ते कैरीपर्यंतची सर्वच फळं खाली पडली. बागांमध्ये सडाच्या सडा पहायला मिळत आहेत. बागांमधील झाडेच कोसळल्याने शेतकरी कायम उत्पन्नाला मुकला आहे. घोघावत्या वादळात शेतकरी हताश झाला होता. या वादळात शेवटच्या टप्प्यातील आंब्यांची पूर्णतः वाताहात झाली. आंबा पडून आपटल्यामुळे कॅनिंगलाही तो घेतला जाणार नाही. त्यामुळे कोट्यवधीचे नुकसान बागायतदारांना सहन करावे लागणार आहे.