स्टील पाईप विद्युत वाहिनीला लागल्याने शॉक लागून एकाचा मृत्यू 

चिपळूण:- रस्त्यावर जयभीम स्तंभाचे बांधकाम करताना हातातील पाईप विद्युतभारीत वीज वाहिनीला लागल्याने शॉक लागून 48 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चिपळूण तालुक्यातील पिंपळी बुद्रुक येथे 14 एप्रिल रोजी घडली. संजय शंकर सावंत (48, पिंपळी बु. बौध्दवाडी) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सावंत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नवीन स्तंभाचे बांधकाम करुन त्यावर स्तंभाच्या गोलाईमध्ये पाईप लावण्याचे काम करत होते. यावेळी पाईप व्यवस्थित न बसल्याने त्यांनी तो हलवून पुन्हा काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी वरुन जाणार्‍या विद्युत भारीत तारेला पाईप लागल्याने सावंत यांना जोरदार शॉक लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर भाचा रत्नदीप कांबळे (32, पिंपळी बु. बौध्दवाडी, चिपळूण) याने येथील पोलीस स्थानकात दिली.