सोमेश्वर राडा प्रकरणी तिघांना अटक तर पाचजण अद्याप फरार

रत्नागिरी:- शहरानजिकच्या सोमेश्वर गावातील राष्ट्रवादी कार्यकर्ता कै.रविंद्र उर्फ रवी मयेकर यांच्या हत्येच्या रागातून रविवार, सोमवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या राड्यातील एका गुन्ह्यात सुरज मयेकर याला मारहाण करणार्या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर दीपक उर्फ बाब्या मयेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणार्‍या अक्षय प्रकाश मयेकर, प्रथमेश सुभाष बिडू, सुरज प्रकाश मयेकर, निलेश अनंत मयेकर, आशिष अनंत मयेकर या पाचजणांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते पाचहीजण गावातून गायब झाले असून ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सोमेश्वर गावात सुमारे १४ वर्षांपूर्वी राजकीय वादातून रवींद्र उर्फ रवी मयेकर या तरुणाची निघृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा वाद पुन्हा सोमेश्वर गावात उफाळून आला आहे. हत्येमध्ये शिक्षा झाल्याच्या रागातून रविवारी रुपेश मयेकरसह तिघांनी हत्या झालेल्या कै . रवी मयेकर यांच्या पुतण्याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थनाकात गुन्हा दाखल झालेला असतानाच सोमवारी दुपारी विरोधी गटातील अक्षय प्रकाश मयेकर, प्रथमेश सुभाष बिडू, सुरज प्रकाश मयेकर, निलेश अनंत मयेकर, आशिष अनंत मयेकर या पाच जणांनी दीपक उर्फ बाब्या मयेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

दोन्ही राड्यावरुन ग्रामीण पोलीस स्थानकात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुरज मयेकर यांच्या तक्रारीवरुन रुपेश मयेकर ,वीरेंद्र शिंदे, संदीप कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात रुपेश मयेकर ,वीरेंद्र शिंदे, संदीप कदम या तिघांना मंगळवारी ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. तर दीपक मयेकर यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी अक्षय प्रकाश मयेकर, प्रथमेश सुभाष बिडू, सुरज प्रकाश मयेकर, निलेश अनंत मयेकर, आशिष अनंत मयेकर या पाचजणांविरोधात भादंविक ३०७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पाचहीजण गावातून गायब झाले आहेत. ग्रामीण पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.