सापळा रचत सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांकडून बेड्या

चिपळूण:- हेराफेरी करुन चौघांनी एका वृध्दाची सोन्याची चेन लंपास करण्याची घटना शिरगाव (ता. चिपळूण) येथे घडली. या घटनेनंतर सापळा रचून कुंभार्ली तपासणी नाका येथे त्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन अंगठ्यांसह तीन चेन असा ऐवज हस्तगत केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची फिर्याद मनोहर कासार यांनी दिली आहे. राजेश मदारी, भविष्यनाथ मदारी, धारानाथ मदारी, जाधवनाथ मदारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे चौघेजण एका कारमधून शिरगाव येथे आले होते. त्यावेळी रस्त्याने जात असताना त्यांनी कासार यांना थांबून शंकर मंदिर कुठे त्याची माहिती विचारली, त्यावेळी त्या चौघांनी कासार यांना जादुगिरी करत त्यांच्याकडे असलेली चेन मागून घेत त्यांच्याशी हेराफेरी करत ही चेन त्यांना न देता निघून गेले.

याबाबत कासारे यांनी शिरगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी घाटमाथ्याला जोडणाऱ्या कुंभार्ली घाट तपासणी नाक्यावर सापळा रचून या आरोपींना कारसह ताब्यात घेतले. त्यावेळी तपासणी केली असता त्यांच्याकडे दोन चेन व अंगठी असा ऐवज आढळला.