अधिकारी फक्त खुर्चीवर बसून काम करत असल्याचा आरोप
रत्नागिरी:- मिरकरवाडा येथील नव्या योजने अंतर्गत टाकण्यात आलेले पाण्याचे पाईप सातत्याने फुटत आहेत. येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहेत. अधिकारी केवळ खुर्चीवर बसून कारभार हाकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आधी पाणी योजनेचा ठेकेदार आणि आता नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत असल्याचा आरोप माजी नगरसेवक सोहेल साखरकर यांनी केला आहे.
मिरकरवाडा येथील स्मशानभूमी, कावळेवाडी, दांडा फिशरिज, पांजरी मोहल्ला, मस्तान मोहल्ला, खडक मोहल्ला, वरचा मोहल्ला या भागात दररोज पाण्याची पाईप लाईन फुटण्याचे प्रकार घडत आहेत. दांडा फीशरिज ते पाटील कंपनी या दरम्यान पाईप लाईन ची दुरुस्ती जवळपास दहा वेळा करण्यात आली. हंजर फॅक्टरी नजिक पाईप लाईनचे वीस ते पंचवीस वेळा काम करण्यात आले. मात्र तरी देखील एक ते दोन दिवसांनी पाईप लाईन कुठे ना कुठे फुटण्याचे प्रकार सुरूच आहेत.
सातत्याने पाईप लाईन फुटत असल्याने मिरकरवाडा येथील पाणी पुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे. पाणी मिळत नसल्याने येथील लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून देखील अधिकारी केवळ फोनवर काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रशासनाने वेळीच येथील पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा नागरिकांच्या मोठ्या रोषाचा सामना करावा लागेल असा इशारा सोहेल साखरकर आणि उबेद होडेकर यांनी दिला आहे.