रत्नागिरी:- सलग दुसर्या दिवशी मुसळधार पाऊस झाला असून जिल्ह्यात मॉन्सून स्थिरावला आहे. संगमेश्वर पांगरी रस्त्यावर दरड कोसळली तर, रत्नागिरीत पूर्णगड येथे भिंत कोसळली आणि किल्ला येथे घरांची संरक्षक भिंत कोसळली, धाऊलवल्लीत रस्ता खचला आहे. नद्या, नाल्यांसह धरणातील पाणीसाठा वाढला असून बळीराजा सुखावला आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
जिल्ह्यात शनिवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासात सरासरी ५७.११ मिलीमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड २५, दापोली ५४, खेड ४, गुहागर ४१, चिपळूण १३, संगमेश्वर ३७, रत्नागिरी १४०, लांजा १२०, राजापूर ८० मिमी नोंद झाली. १ जूनपासून आतापर्यंत सरासरी २९१.८० मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षीपेक्षा १,११६ मिमी पाऊस झाला असून तुलनेत ८०० मिमी कमी नोंद झाली. मॉन्सून जुनच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाला, पण तो स्थिरावला नव्हता. मात्र गेले दोन दिवस मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच पावसाचा जोर होता. दिवसभर पडलेल्या पावसामुळे जगबुडी, वाशिष्ठी, काजळी, बावनदी, अर्जुना, कोदवली या नद्यांचे पाणी वाढले आहे. रत्नागिरीतील कळझोंडी धरण भरुन वाहू लागले आहे तर पानवल, शिळ धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
सततच्या पावसामुळे नव्याने बांधलेल्या बावनदी ते देवरुख रस्तावर ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. पांगरी गावाजवळ दोन ठिकाणी मोठे दगड रस्त्यावर आले होते. पन्नास मीटरच्या भागात रस्त्यावर माती आल्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती; मात्र ही माहिती मिळाल्यानंतर बांधकाम विभागाने ठेकेदाराला माहिती दिली आणि माती, दगड हटवण्याच्या सुचना दिल्या. पोकलेनच्या मदतीने रस्त्यावर आलेली दरड बाजूला करण्यात आली. डोंगराकडील ज्या भागात फक्त माती आहे, तेथे पुन्हा दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहने हाकताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील शिवने-ताम्हाणे रस्त्यावर दरड कोसळल्याने याचा फटका वाहतूकीला बसला आहे. राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली आंबेलकरवाडी येथे यावर्षी बांधलेल्या संरक्षक भिंतीचा भराव खचला आहे. या मार्गावरील एसटी वाहतूक बंद आहे. कोदवली, अर्जुना नदीचे पाणी वाढले आहे. रत्नागिरी तालुक्यातील पुर्णगड येथे पावसामुळे विलास पवार यांच्या घराजवळ भिंत कोसळून तर शंकर पवार यांच्या शौचालयाचे अंशतः नुकसान झाले. तसेच किल्ला दसपट वाडी येथील भागेश्वर मंदिर आवाराचा गडगा कोसळून पावसाचे पाणी वाहून नेणार्या पर्या बंद झाला आहे. रस्त्यावरून वाहत जाणारे पाणी लोकांच्या घरात शिरून नुकसान झाले. या ठिकाणी राहणारे जाधव, बापर्डेकर, ढोले यांच्या घरात पाणी शिरल्याने तेथील नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.