सर्वाधिक बाधित भागाला ‘उद्रेकजन्य’ चा शिक्का

कोरोना नियंत्रणासाठी निर्बंध; चाचण्या वाढविण्यावर भर

रत्नागिरी:- चाचण्या वाढवूनही दररोज सापडणारे बाधित पाचशेच्या दरम्यान असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक बाधित सापडणारी गावे, वाड्या उद्रेकजन्य म्हणून जाहीर करुन ती कोरोना प्रतिबंधित क्षेत्र केली जात आहेत. रत्नागिरी तालुक्यात नऊ गावे उद्रेकजन्य आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाने वाडीवस्तीवर हातपाय पसरल्यामुळे तेथपर्यंत पोचून बाधितांना शोधण्याची मोहीम हाती घ्यावी लागत आहे. राज्यातील सात जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असल्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी तेथील निर्बंध शिथिल करु नयेत अशा सुचना दिल्या. तसेच नियंत्रणासाठी प्रशासनाने योग्य ते नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर मायक्रो नियोजनावर भर दिला गेला. त्यात पॉझिटीव्हीटी दर 5 टक्केच्या खाली आणण्याचे नियोजन केले आहे. अधिक बाधित असलेल्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ती गावे किंवा वाडी उद्रेकजन्य भाग म्हणून जाहीर केला जात आहे. तो भाग चौदा दिवस कंटेनमेंट केला जात आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्र करण्याचे अधिकार प्रांताधिकार्‍यांना दिले आहेत. त्यांच्यामार्फत ही गावे उद्रेकजन्य म्हणून जाहीर केली जात आहेत. दाटीवाटीची लोकवस्ती, उद्योग वसाहतींच्या ठिकाण असलेल्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. रत्नागिरी तालुक्यातील नऊ गावे उद्रेकजन्य भाग म्हणून घोषीत केली आहेत. त्या भागात कोरोना प्रतिबंधीत क्षेत्रातील नियम लागू राहणार आहेत. या गावातील अत्यावश्यक सेवाच कार्यरत राहणार आहेत. बाधित भागातील शंभर टक्के लोकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर निगेटीव्ह लोकांची संख्या पाहूनच निर्बंध हटविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.