पत्नी सोनालीशी असलेल्या अंतर्गत वादातून संदेशने उचलले टोकाचे पाऊल
लांजा:- कोट येथील दुहेरी हत्याकांडात धक्कादायक माहिती पुढे आली असून संदेश यानेच स्वतःची पत्नी आणि मुलाचा खून केल्याचे पोलीस तपासात कबूल केले आहे.त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंब संपवून संदेशाला स्वतःला संपवायचे होते असे देखील संदेशने पोलीस तपासात माहिती दिली आहे.
गुरुवारी पहाटे तालुक्यातील कोट पाष्टेवाडी येथे पत्नी आणि मुलाचा खून केल्याचे दुहेरी हत्याकांड उघडकीस आले होते. प्रथमदर्शनी संदेश चांदिवडे यांनेच हा खुन केल्याचे जवळपास स्पष्ट झाले होते. घटनेनंतर तो फरार झाला होता. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सहा पथके तयार केली होती. अखेर त्याला गुरुवारी रात्र आठ वाजण्याच्या दरम्याने कोट परिसरातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
याबाबत माहिती देताना लांजा पोलिसांनी सांगितले की, सोनाली आणि संदेश यांचा विवाह २०१६ मध्ये झाला होता. सोनाली ही सोशल मीडिया, मोबाईलवर ऍक्टिव्ह असायची. यातून सून, सासू आणि नवरा यांच्यात वारंवार खटके उडायचे. या सगळ्या गोष्टींची माहिती तिच्या माहेरी देखील संदेशाने दिली होती. त्यानंतर जुलै महिन्यात संदेश हा पत्नी सोनाली आणि मुलांसह लांजा येथे राहायला आला होता. दि.१९ जुलै रोजी सोनाली ही नवऱ्याला चिठ्ठी लिहून मुलांना तिथेच सोडून गायब झाली होती. त्यानंतर संदेशने पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद लांजा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. २९ जुलै रोजी सोनाली हिने पुन्हा नवरा संदेशाला फोन करून मला तुझ्याकडे राहायला यायचे आहे असे सांगितले होते. त्यानंतर तो पती संदेशने सोनाली ला घेऊन लांजा पोलीस ठाण्यात गेले होते आणि त्यानंतर पोलिसांनी या दोघांचे समुपदेशन करून त्यांना घरी पाठवले होते. त्यानंतर ही दोघे कोट राहायला गेले होते.
गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सोनाली ही पनवेलला जायला निघाली होती. यातून नवरा बायकोत वाद झाला. पत्नी सोनाली ही घराच्या पाठीमागे अंघोळीसाठी पाणी तापवण्यासाठी गेली असता संदेशाने पाठीमागून तिच्यावर मानेवर कोयत्याने वार केला. वार खोलवर बसल्याने सोनालीचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर संदेश याने मुलगा प्रणव याचा तोंडावर उशी दाबून त्याचा देखील खून केला. त्यानंतर तो घटनास्थळावरून पळून गेला.
गावाजवळ असलेल्या चिरेखाणीत लपून बसला होता. निवसर रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या करण्याच्या उद्देशाने जाऊन आला. पण आपल्या तीन वर्षे मुलाच्या काळजीने आत्महत्या न करता तो परत आला आणि त्यानंतर सायंकाळी कोट परिसरातच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी माहिती देताना त्यांना सांगितले की, आपणच मुलगा आणि बायकोचा खून केल्याची कबुली दिली. दोघं पती-पत्नीमध्ये अंतर्गत वाद धुमसत होता. मात्र त्याचा आज विस्फोट झाला आणि संदेशाने रागाच्या भरात पत्नी आणि मुलाचा खून केला .आणि या घटनेनंतर त्याला संपूर्ण कुटुंब संपवायचे होते आणि त्यानंतर स्वतः देखील आत्महत्या करायची होती असे पोलीसांनी सांगितले.
या घटनेच्या तपास कामांमध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग रत्नागिरीचे एपीआय श्री गोरे, हेड कॉन्स्टेबल शांताराम झोरे ,योगेश शेट्ये, सुभाष भागणे, चालक अतुल कांबळे तसेच लांजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण देशमुख, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे, नासिर लावलेकर, तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, हेड कॉन्स्टेबल अरविंद कांबळे, तेजस मोरे, तसेच सचिन भुजबळराव यांनी कामगिरी बजावली.
दरम्यान, संदेश चांदवडे याला आज शुक्रवारी राजापूर दिवाणी न्यायालया समोर उभे केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची म्हणजे ११ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.