रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील डींगणी – करजुवे मार्गावर मच्छि विक्री करणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडला आहे. जंगल परिसरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेचा अपघात की घातपात याबाबत याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहेत.
डिंगणी – करजुवे, पिरंदवणे अशा ४-५ गावामध्ये ही महिला मच्छि विक्री करून कुटुंबाचा उदर निर्वाह करते. बुधवार 15 फेब्रुवारी रोजी त्या घरातून सकाळी मच्छि विक्रीसाठी बाहेर पडल्या. मात्र दुपारपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. शोधाशोध करत असताना डिंगणी – करजुवे रोडवर त्यांची माशांची टोपली पडलेली दिसली. आजूबाजूला शोध घेतला असता रस्त्याच्या बाहेर जंगलात तिचा मृतदेह आढळून आला. जवळपास 30-40 फुटावर ओढत नेऊन निर्जनस्थळी हा मृतदेह टाकण्यात आला होता. तिच्या तोंडावर जोरदार प्रहार झाल्याचे दिसून आले. तिचा चेहरा ओळखणे मुश्किल झाले होते. नातेवाईकांनी लगेचच या घटनेची माहिती संगमेश्वर पोलिसाना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. या घटनेचा पोलिस कसून तपास करत आहेत.
प्राथमिक तपासात हा अपघात असल्याचे बोलले जात आहे. मात्र अपघात असेल तर जंगल भागात मृतदेह कसा आढळून आला. आणि तोंड ठेचलेला स्थितीत आढळून आल्याने घात की अपघात अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र पोस्ट मोर्टेम रिपोर्ट आल्यानंतरच याचा उलगडा होणार आहे.
दरम्यान डीगणी परिसरात चिरे, वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. वर्दळ कमी असल्यामुळे बेदरकारपणे वाहने चालवली जातात. वाहन चालकांवर कोणाचे नियंत्रण राहिलेले नाही. आणि त्यातूनच महिला ठार झाली नसेल ना? अशी सुद्धा चर्चा सुरू आहे.