बेमुदत संपाचा निर्धार; संघटनांची संयुक्त बैठक
रत्नागिरी:- राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या बेमुदत संपाच्या तिसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांची बैठक शिक्षक पतपेढीत झाली. जुनी पेन्शन योजना जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत बेमुदत संप चालूच ठेवायचा असा निर्धार सर्व संघटनांनी केला. जे शिक्षक शाळेत उपस्थित होते त्यांच्या संघटना पदाधिकाऱ्यांनी भेटी घेऊन सरकारची कर्मचारी विरोधात असलेली मानसिकता पटवून दिली. त्यामुळे ते पुन्हा संपात सहभागी झाले.
जिल्हा समन्वय संघटना बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना, प्राथमिक शिक्षक संघ (दोन्ही), प्राथमिक शिक्षक सेना, पदवीधर शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, दिव्यांग संघटना आदी सर्व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. प्राथमिक शाळा १६ मार्चपासून सकाळच्या सत्रात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काही शिक्षक सकाळी शाळेत रूजू झाल्याची कुणकुण संघटना प्रतिनिधींना लागली. त्यामुळे सर्व तालुक्यातील संपात सहभागी शिक्षक संख्या आढावा घेण्यासाठी प्राथमिक शिक्षक पतपेढी, प्रधान कार्यालयात सर्व संघटनाची तातडीची सभा आयोजित करण्यात आली होती. सकाळच्या सत्रात ज्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत तेथे प्रत्यक्ष जाऊन शिक्षकांची भेट घेतली जाणार आहे. त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. त्यानुसार सर्व तालुक्यातील प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या तातडीची सभा घेऊन त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात शुक्रवारी (ता. १७) सुरवात करण्यात आली आहे. आज किरकोळ प्रमाणात जे शिक्षक शाळेत उपस्थित होते त्यांना पदाधिकाऱ्यांनी भेटी दिल्या. सरकारची कर्मचारीविरोधात असलेली मानसिकता पटवून देण्यात आली. त्या वेळी पुनश्च संपात सहभागी होण्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यामुळे सर्व संघटना अध्यक्ष, प्रतिनिधी यांनी समाधान व्यक्त केले.