शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा वृद्ध ताब्यात

राजापूर:- शाळेतून घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला वाटेत एकांतात गाठून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी राजापूर तालुक्यातील हसोळतर्फे सौंदळ येथील वयोवृध्द इसमाला राजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सध्या उन्हाळा सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात सुरू करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन मुलगी ज्या शाळेत शिक्षण घेत आहे, त्या शाळेत जाणारी मुलगी नेहमीच एकटीच ये-जा करते. काही दिवसापूर्वी नजीक असलेल्या दुकानात जाऊन घरामधून सांगितलेल्या वस्तू खरेदी करत घरी परतली – मात्र अर्ध्या वाटेवर निर्जन ठिकाणी बसलेल्या त्या वयोवृध्द इसमाने तिला एकटी येत असल्याचे पाहून तिचा विनयभंग केला. शारीरिक चाळे करीत अव्यार्च्य भाषेत तिला समजावू लागला, मात्र तिने त्याला दाद न देता ढकलून देत धावत जाऊन शेजारी असलेल्या आतेचे घर गाठले. आत्याला झालेली सर्व घटना सांगितली. आतेने मुलीच्या आई व बहिणीला दूरध्वनीवरून घरी बोलावून झालेली घटना सविस्तर सांगितली. यात दुपार टळल्याने व नंतर राजापूर शहराकडे येणारी बस नसल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी राजापूर पोलीस स्टेशन गाठत संबंधित इसमाविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर राजापूर पोलिसानी संबंधित व्यक्तीला लगेच ताब्यात घेत त्याची रवानगी रत्नागिरी जिल्हा पोलीस कोठडीत केली.