शहराची मुख्य जलवाहिनी नाचणे जलशुद्धीकरण केंद्राला जोडणार

रत्नागिरी:- शहराला पाणी पुरवठा करणार्‍या मुख्य जलवाहिनीला नाचणे जलशुद्धीकरण केंद्र जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवून हे काम सुरू करण्यात आले. काम सुरू करण्यापूर्वी शहरातील पाण्याच्या टाक्या भरून घेण्यात आल्या असून मंगळवारी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहील असे रनप प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या शिळ धरणावरच जॅकवेल कोसळल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा तब्बल 12 दिवस विस्कळीत झाला होता. अनेक भागाला पाणी पुरवठा झालाच नाही. पर्यायी व्यवस्था नसल्याने रत्नागिरी शहर ऐन गणेशोत्सवात पाण्यापासून वंचित राहिले. अशीच अवस्था जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्यानंतर होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

शहरातील साळवी स्टॉप जलशुद्धीकरण हे एकच केंद्र सुरू आहे. याठिकाणी बिघाड झाल्यास शहराचा पाणी पुरवठा खंडित होण्याची भीती असते. त्यामुळे नाचणे येथील दुसरे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. नाचणे जलशुद्धीकरण केंद्र मुख्य जलवाहिनीला जोडल्यानंतर साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रावर बिघाड झाल्यास नाचणे जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे.

नवीन योजनेंतर्गत या जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू झाले आहे. याचठिकाणी मुख्य जलवाहिनीवरून पाणी नेण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी काम हाती घेण्यात आले असून हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.