सर्व डॉक्टर हजर मात्र कामकाजात अजूनही सहभाग नाही
रत्नागिरी:- जिल्हा शासकिय रुग्णालय व महिला रुग्णालय येथे नव्याने होणार्या वैद्यकीय महाविद्यालयाची राष्ट्रीय वैद्यक आयोगाकडून निरिक्षण सुरु आहे. यासाठी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ निवासी तसेच सहायोगी व सहायक प्राध्यापक असलेल्या २४ डॉक्टरांची रत्नागिरीथ प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्यात आली आहे. संबधीत वैद्यकिय अधिकारी रत्नागिरीत हजर झाले असले तरी प्रत्यक्षात जिल्हा रुग्णालयातील कामकाजात ते सहभागी झालेले नाहीत.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालकांनी या बदल्यांचे आदेश लागू केले आहेत. त्यात त्यांना तातडीने रत्नागिरीत हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अश्विनी मोराळे, सारंग ढवळे, स्वप्नाली पाटील, श्रीकांत बाबर, शर्वरी जगदाळे, अजिंक्य काळे, प्रियेश पाटील, महेंद्र कुमार बनसोडे, प्रिया धांडेरे, ज्योत्स्ना देशमुख, मारोती पवार या सहायक प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक असलेल्या डॉक्टरांच्या बदलीचे आदेश झाले. तर अभिषेक देशमुख, अभिजित खोत, नील लिमये, अविनाश सागर, अक्षय पाटील, राजवर्धन कदम, अंजना असोकन अमथन एस. कपिल निकाUजे, स्वप्ना कदम, सुजय खर्डेकर, गणेश बोरवाड, सुमित अवरासंघ अशा तेरा वरिष्ठ निवासी डॉक्टरांची बदली करण्यात आली.
सर्व वैद्यकीय अधिकारी नव्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता यांच्याकडे हजर झाले आहे. मात्र ते जिल्हा रुग्णालयातील कामकाजात सहभागी झालेले नाहीत. तर एकाच वेळी २४ वैद्यकीय अधिकार्यांना प्रतिनियुक्तीवर रत्नागिरीत पाठविण्यात आल्याने कोल्हापूर येथे रुग्णसेवेची बोंबाबोंब सुरु झाली आहे.