लांजा:- भक्ष्याची शिकार करत असताना विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यु झाला. लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली बेर्डेवाडी येथील मनोहर भिकाजी साईल यांच्या घरा शेजारी असलेल्या विहिरीमध्ये मादी जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला .
मिळालेल्या माहितीनुसार विहीर मालक मनोहर साइल हे दुपारी पाळीव जनावरांना पाणी काढण्यासाठी विहिरीत टाकलेला पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. विहिरीतून पंपाद्वारे पाणी येत का नाही म्हणून विहिरीत टाकलेला पाण्याचा फुटबॉल पाहण्यासाठी विहिरीत डोकाउन पाहिले असता त्यांना बिबट्या विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला.
त्यांनी प्रभानवली गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पांचाल याना सांगितले तसेच तात्काळ लांजा वनविभागाला याची खबर दिली. वनविभागाला खबर मिळताच वनविभाग लांजाचे अधिकारी सागर पताड़े व सहकारी यानी तात्काळ घटनास्थळी पोहचले व मृत मादी जातीच्या बिबट्याला बाहेर काढले.