रत्नागिरी:- निवडून आल्यावर शिक्षकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन रस्ते व गटारांवर निधी खर्च करणार्या शिक्षक आमदारांपेक्षा पराभवानंतरही शिक्षकांसाठी सातत्याने लढा देणार्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठिशी येथील शिक्षक मतदार ठाम उभा आहे. विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघामधून बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विक्रमी मताधिक्क्याने विजयी होतील असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
रत्नागिरीत पाली येथील ना. सामंत यांच्या निवासस्थानी उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. यावेळी शिक्षक संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह माजी आमदार सदानंद चव्हाण, राजन तेली, प्रमोद जठार यांच्यासह दोन्ही पक्षांचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष, शहरप्रमुख, विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ना. सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मिळून ज्ञानेश्वर म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे आ. बाळाराम पाटील यांनी गेल्या सहावर्षात रस्ते व अन्य कामांवर निधी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. गत निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शिक्षकांसाठी अनेक कामे केली आहेत. त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. ते स्वत: मुख्याध्यापक असल्याने त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. त्यामुळे शिक्षकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे.
कोकण शिक्षक मतदार संघात जवळपास 37 हजार मतदार आहेत. यातील सिंधुदुर्ग 2 हजार, रत्नागिरी 4 हजार, रायगडमध्ये 8 ते 9 हजार असून, होणार्या मतदानातील ऐंशी टक्के मतदान हे म्हात्रे यांना होईल असा विश्वास ना. सामंत यांनी व्यक्त केला. उर्वरीत मतदान हे ठाणे, पालघरमध्ये असून मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्यामुळे म्हात्रे यांचा विजय पक्का असल्याचेही ना. सामंत यांनी सांगितले.
शिक्षकांसाठी शिक्षक उमेदवार ही भुमिका बाळासाहेबांची शिवसेना व भाजपाची आहे. त्यामुळे प्राधान्याने म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिक्षक मतदार संघातून निवडून येणार्या आमदाराने आपला बहुतांश निधी हा शाळांचे प्रश्न, उपक्रम यावर खर्च करायला हवा असे मतही ना. सामंत यांनी यावेळी व्यक्त केले.