मुक्त संचारामुळे रुग्णसंख्येत वाढ
रत्नागिरी:- कोरोनाच्या अनुषंगाने जारी करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या नियमांमध्ये शासनाने शिथिलता आणली आहे. त्यातून बाजारपेठांसह उद्योग-व्यवसाय खुले झाले आहेत. काही दिवसांपूर्वी मंदिरे आणि शाळाही सुरू झाल्या. या साऱ्यांमध्ये लोकांचा बिनधास्तपणे विना मास्क मुक्तसंचार दिसत आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या असल्या, तरी त्याकडे लोकांकडून गांभीर्याने पाहत नसून कोरोनाचा विसर पडला वा कोरोना संपला, अशा मानसिकतेतून लोकांचा बिनधास्त वावर सुरू झाला आहे. त्यातून कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. गेल्या महिन्याभरात कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे
लॉकडाउनच्या काळामध्ये उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने सर्वसामान्यांचे पुरते हाल झाले होते. मात्र रुग्णांची संख्या घटल्याने शासनाने लॉकडाउनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता आणली आहे. त्यातून बाजारपेठा खुल्या झाल्या आहेत. उद्योग-व्यवसाय सुरू झाले आहेत. मंदिरे उघडली गेली असून चार दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र आरोग्य विभागाने दिवाळीनंतरच्या वाढत्या थंडीतून कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट अद्यापही पूर्णपणे टळलेले नाही. मात्र काही महिन्यांपासून कोरोनाच्या भीतीच्या छायेखाली असलेल्या लोकांची मानसिकता कमालीची बदलल्याचे चित्र आहे. सार्वजनिक ठिकाणे, बाजारपेठा वा अन्य ठिकाणी ग्रामस्थ बिनधास्तपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत. दुकानांमध्येही शारीरिक अंतर पाळण्याच्या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.
लॉकडाउनच्या काळात विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. त्यामुळे लोकही नियमांचे पालन करताना मास्कचा काटेकोरपणे वापर करताना दिसत होते. मात्र लॉकडाउनमधील शिथिलतेमध्ये लोकांप्रमाणे प्रशासनही बेफिकिर झाल्याचे चित्र दिसत आहे. विनामास्क फिरणाऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्यांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे दिसत नाही.