लांजात अल्पवयीन मुलाकडून बापाच्या डोक्यात हातोडा घालून खून 

लांजा:-लांजा तालुक्यात अल्पवयीन मुलाने बापाच्या डोक्यात हातोडा मारून खून केल्याची घटना घडली आहे. लांजा तालुक्यातील पुनस बौद्धवाडी येथे घडली आहे. ही घटना काल सोमवार 21 मार्च रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अल्पवयीन मुलावर लांजा पोलिस ठाण्यात मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पुनस बौद्धवाडी येथील रहिवासी असलेले रवींद्र रावजी कांबळे (४० वर्षे) हे पुनस ग्रामपंचायतीत पाणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते आपल्या पत्नीचा चारित्र्यावर सतत संशय घेत असत. त्याचप्रमाणे मुलगा यालादेखील तू माझा मुलगा नाहीस असे वारंवार हिणवत असत. प्रत्येक वेळी ते भांडण करून त्याला अशाप्रकारे बोलत असत. सोमवारी २१ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास रविंद्र कांबळे यांनी पत्नीशी जोरदार भांडण केले. तसेच मुलाला देखील ‘तू माझा मुलगा नाहीस’ असे हिणवले. याचा राग येवून मुलाने घरातील लोखंडी हातोडा घेवून वडील रवींद्र कांबळे यांच्या डोक्‍यावर मागील बाजूने जोरदार प्रहार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते.

 रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांबळे यांना जखमी अवस्थेत शनिवारी रात्रीच रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुगडे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी लांजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मानव साळोखे यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. 

दरम्यान, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेले रविंद्र कांबळे यांचा मंगळवारी २२ मार्च रोजी मृत्यू झाला. त्यामुळे वडिलांच्या मृत्यू प्रकरणी अखेर लांजा पोलिसांनी मुलावर भा.द.वि.कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली असून अधिक तपास लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक  दादासाहेब घुटुगडे हे करीत आहेत.