राजधानीचे इंजिन घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प तर महामार्ग देखील काम सुरू असल्याने बंद; कोकणात येणाऱ्यांचा खोळंबा

रत्नागिरी:- कोकण रेल मार्गांवर उक्षी टनेल नजीक मडगांवाकडे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. यामुळे सर्व वाहतूक ठप्प झाली होती. पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. तर चिपळूण येथे पुलाचे काम चालु असल्याने  वाहतूक बंद करण्यात आली असून महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कोकणात येणार दोन्ही मार्ग ठप्प झाल्याने कोकणात येणाऱ्या प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. 

रत्नागिरी स्थानकपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या उक्षी टनेल येथे पहाटे राजधानीचे इंजिन घसरले. ही दुर्घटना घडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.  सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

या प्रकारामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रत्नागिरी स्थानकात कोचीवली एक्सप्रेस, भोके येथे सीएसटीएम कडे जाणारी, चिपळूणला नागकोईल एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस खेडला तर मंगला एक्सप्रेस वैभवावाडीला थांबवून ठेवण्यात आली होती. या मार्गांवर अजून काही तास वाहतूक ठप्प राहणार आहे.