रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानकावर हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसमध्ये (ट्रेन क्र. २२६५५) एका प्रवाशाला मारहाण करण्यात आली. ही घटना २३ एप्रिल रोजी रात्री १०.३० ते ११.२४ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सागर सुरेश पवार (वय २७, रा. साखरीनाटे (खुर्द), ता. जि. रत्नागिरी) या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कीसलसिंग डागुर (वय ३६, रा. खिपकापुरा, ता. इंडोर, जि. करोली, राजस्थान) हे हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसच्या इंजिनकडील दुसऱ्या जनरल डब्यातून प्रवास करत होते. गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबत असताना, आरोपी सागर पवार याने फिर्यादी यांना सीटवर बसण्यास जागा न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर रागाच्या भरात त्याने फिर्यादी यांच्या डोक्यात छोटा लोखंडी रॉड मारून त्यांना दुखापत केली आणि धमकी दिली, असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जखमी कौसलसिंग डागर यांच्यावर उपचार सुरू असून, पोलिसांनी आरोपी सागर पवारला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.