कोरोनाने निवडणूक लांबणीवर; मंडणगड नगर पंचायतीवर प्रशासक नियुक्ती
रत्नागिरी:- नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून अद्यापही जाहीर न झाल्याने जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, खेड नगर परिषद व दापोली नगरपंचायतीवर मुदतीनंतर प्रशासक नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मंडणगड नगर पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील ४ नगर परिषद व एका नगरपंचायतीची मुदत संपत असल्याने पंचवार्षिक निवडणूका होतील, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. रत्नागिरीत नगर परिषद निवडणुकीची रणनिती एक वर्षापूर्वीच ठरविण्यात आली आहे. वॉर्डरचना कशी असेल? कोणते वॉर्ड आरक्षित होतील? हे चित्र आधीच स्पष्ट झालेले आहे. रत्नागिरी नगर परिषदेवर सध्या शिवसेनेची एकहाती सत्ता आहे तर राजापूर नगर परिषद ही कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. चिपळूणमध्ये भाजपचे नगराध्यक्ष असून खेड नगर परिषद मनसेच्या ताब्यात आहे.
येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये नगर परिषद ताब्यात ठेवण्याकरिता सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे तर भाजपनेदेखील वॉर्डनिहाय चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे. राजकीय पक्षांची तयारी झालेली असताना निवडणूक आयोगाने मात्र पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम अद्यापही जाहीर केलेला नाही.
ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत पूर्ण होते त्याच्या सहा महिने आधी राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतो. मात्र राज्यात कोरोनाचा कहर सुरू असल्याने यावेळच्या निवडणूका कोरोनाच्या सावटाखाली आल्या आहेत. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने अद्यापही निवडणुकीची कोणतीही अधिसूचना जाहीर केलेली नाही.
राज्य निवडणूक आयोगाची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासन आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभागनिहाय अथवा वॉर्डनिहाय रचना कशी केली याची माहिती स्थानिक निवडणूक आयोगाला सादर करते. त्यानंतर वॉर्डनिहाय आरक्षण सोडत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत काढली जाते.
सध्या जिल्ह्यात ४ नगर परिषद व १ नगर पंचायत यांची मुदत डिसेंबरमध्ये संपत असून राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणतीही निवडणुकीबाबतची अधिसूचना जाहीर न केल्याने मुदत संपलेल्या नगर परिषद व नगर पंचायतीवर प्रशासक नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.