रत्नागिरी:- आगामी रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वच्या सर्व प्रभागात लढायची तयारी करत आहे. अजुनही शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा कोणताच प्रस्ताव पक्षाकडे आलेला नाही, माहिती प्रदेश नेते बशीर मुर्तुझा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रांतिक सदस्य कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले आदी उपस्थित होते. यावेळी श्री. मुर्तूझा म्हणाले, शिवसेेनेच्या पदाधिकार्यांनी आघाडीबाबत आढावा घेण्यासाठीच्या बैठीकीत चर्चा केली होती. त्या वृत्तामुळे राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्य संभ्रमाचा वातावरण निर्माण होऊ शकते. आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आलेला नाही. यासाठी शिवसेनेकडून पुढाकार घेतला पाहीजे. त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर स्थानिक पातळीवर सर्वांशी चर्चा करुन वरीष्ठांकडे अहवाल पाठविला जाईल. वरीष्ठ योग्य तो निर्णय घेतील. सध्या शिवसेनेकडील इच्छुकांची भाऊगर्दी आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन उमेदवारांना बळ देण्याचे काम सुरु आहे. सर्व प्रभागात उमेदवार उभे करण्याची तयारी आहे. आमच्यादृष्टीने वातावरणही चांगले आहे. 23 डिसेंबरला मुदत संपत असल्यामुळे त्यानंतर प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. निवडून येणार्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही. शहरातील पालिकेच्या सध्याच्या कारभारावर नागरिकांची प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने लोकं राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहत आहेत. त्या लोकांचा अपेक्षाभंग होवू नये, या साठी राष्ट्रवादीतर्फे स्वबळावर निवडणूक लढण्याचा हा प्रयत्न आहे.
पालिकेची निवडणुक हे नगरसेवक सुदेश मयेकर यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात येणार आहे. आतापर्यंत चांगल्या पध्दतीने काम केले आहे. शहरातील नागरिकांमध्येही चांगली प्रतिमा आहे. मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरविण्यात येईल, असे मुर्तूझा यांनी सांगितले. तसेच राष्ट्रवादीत गटा-तटाचे राजकारण नाही. मतभेद होते, ते मिटले आहेत. राष्ट्रवादीच्या चिन्हावर पाच नगरसेवक निवडून आले असले तरीही त्यापैकी सुदेश मयेकरच कार्यरत आहेत. उर्वरितांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पुन्हा कुणी इच्छुक असले तर त्यांची क्षमता पाहून निर्णय घेण्यात येईल. तर अन्य पक्षातून आयत्यावेळी येणार्यांचा विचार निवडणुकीवेळच्या परिस्थितीवरच राहील असे त्यांनी सांगितले.
निधी महाविकास आघाडीने दिलाय: मिलिंद कीर
रत्नागिरी शहरासाठी जो विकास निधी आला तो राज्यमंत्री प्राजक्त तानपुरे यांच्याकडून आलेला आहे. तो निधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे, असे माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनी सांगितले. शासनाकडून आलेला निधी खर्च करताना पालिकेतील सत्ताधार्यांकडून योग्य नियोजन करण्यात आलेले नव्हते. त्याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागला असल्याचेही कीर यांनी सांगितले.