रत्नागिरीतील चरवेली सरपंच बिनविरोध तर इतर तीन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी दहा उमेदवार

सदस्य पदाच्या 46 जागांसाठी 125 उमेदवार रिंगणात

रत्नागिरी:- जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. यात रत्नागिरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यात तालुक्यातील सर्वात मोठ्या शिरगाव ग्रामपंचायतीचा देखील समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी अंतिम दिवस होता. चार ग्रामपंचायतीच्या 46 जागांसाठी 125 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

तालुक्यातील चरवेली, फणसोप, शिरगाव आणि पोमेंडी खुर्द या चार ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची घोषणा झाली. यावेळी निवडणुकीत शिंदे गटाची एन्ट्री झाल्याने निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. शिंदे गट आणि भाजप यांची युती सेनेसमोर मोठे आव्हान असणार आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार अंतिम दिवस होता. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. चार ग्रामपंचायतीच्या मिळून 46 जागा असून यासाठी 125 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चारपैकी चरवेली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी केवळ एकच अर्ज आल्याने सरपंच निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. याशिवाय फणसोप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या जागेसाठी 2 अर्ज, शिरगाव सरपंच पदासाठी 4 अर्ज तर पोमेंडी खुर्द ग्रापंचायतीच्या सरपंच पदासाठी देखील चार अर्ज आले आहेत. 

 याशिवाय चरवेली ग्रामपंचायती मधील सदस्यांच्या सात जागांसाठी आठ उमेदवारी अर्ज, फणसोपच्या 11 जागांसाठी 28 उमेदवारी अर्ज, पोमेंडी खुर्दच्या 11 जागांसाठी 37 उमेदवारी अर्ज आणि शिरगावच्या 17 जागांसाठी तब्बल 52 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.