खेड:- शहरातील योगिता दंत महाविद्यालयात बीडीएसच्या चौथ्या वर्षात शिकणाऱ्या आदित्य संजय साळुंखे (२३, रा. बसाप्पापेठ- करंजे, सातारा) याचा शनिवारी रात्रीच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील मेढा बसस्थानकाजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
आदित्य साळुंखे हा आपल्या ताब्यातील पल्सर दुचाकीने पोलादपूर-महाबळेश्वर मार्गे सातारा रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून जात होता. यावेळी आदित्य साळुंखे मेढा बसस्थानकाजवळ सातारा बाजूने आलेली बस स्थानकात जाण्यासाठी उजवीकडे वळली असता आदित्यच्या ताब्यातील दुचाकी आडव्या आलेल्या एसटीवर आदळली. अपघातात त्याच्या डोक्यावरील हेल्मेटही फुटले.
रक्षाबंधनासाठी जाणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू जखमी अवस्थेत त्याने प्रत्यक्षदर्शीना भावास संपर्क साधण्यास सांगितले. कुटुंबिय तातडीने घटनास्थळी पोहोचले. उपचारासाठी त्याला मेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर बनल्याने अधिक उपचारासाठी सातारा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अपघाती निधनाने कुटुंबियांसह महाविद्यालयातील त्याच्या मित्रांनाही धक्का बसला आहे.