रत्नागिरी:- वडिलांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून श्रीराज उर्फ हर्ष राजेंद्र पवार ( रा. म्हाडा कॉलनी, कोकणनगर) या १७ वर्षीय विद्यार्थ्यांने सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.
श्रीराज पवार याला पालकांनी मोबाईल दिला होता. तो मोबाईलवरुन कायम त्याच्या शाळेतील मैत्रिणीसोबत बोलत व चॅटिंग करत असल्याने वडिलांनीन शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. त्यानंतर ते कामावर निघून गेले. मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून श्रीराजने घरातील पहिल्या मजल्यावर जाऊन सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतला. हि गोष्ट त्याच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी पतीला सांगितली. तर गळफास लावलेल्यास्थितीत असलेल्या श्रीराजचे पाय त्यांनी उचलुन धरले होते. शेजारी असलेल्या नागरिकांच्या मदतीने श्रीराजला खाली उतरवून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकिय अधिकार्यांनी त्याला मयत घोिषत केले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक शैलेश सणस यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. त्यानंतर घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. श्रीराज यांच्या निधनामुळे पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.