रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरावर चोर्या करणार्या टोळक्याचे बिंग फुटले आहे. बंदरावरील राजीवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी सोसायटीच्या पेट्रोल पंपावरील पितळीची टाकी चोरणारा येथील सीसीटीव्ही कॅमेरात टिपला गेला. त्याला पकडल्यानंतर जमावाने चोप देऊन त्याच्या सहकार्यांची नावे वदवून घेतली. त्यातील इतर दोघांना बंदरावरील मलबारी जेटी येथे पकडून पिटाई केल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मिरकरवाडा बंदरावरील उभ्या असलेल्या नौकांवरील जाळी, जाळ्याच्या पितळी व तांब्याच्या कड्या, शिसे, डिझेल तसेच बंदरावरील गोडावूनमध्ये आणि पेट्रोलपंपावरील वेगवेगळे साहित्य चोरीस जात होते. पावसाळी बंदीच्या पार्श्वभूमीवर 10 मे पर्यंत मच्छीमार नौका बंदरात आणून उभ्या केल्या जातात. नौकांचे साहित्य गोडावूनमध्येही ठेवले जाते. या ठिकाणच्या वस्तू चोरीस जात होत्या. दरवर्षी 15 मे नंतर अशा चोर्यांना ऊत येत होता. परंतू चोरटे हाती लागत नव्हते. हेच चोरटे राजीवडा महिला मच्छीमार तालुका सहकारी सोसायटीच्या आवारातील नौकेच्या इंजिनवरील पितळीची टाकी चोरण्यासाठी आले आणि त्यांचे बिंग फुटले.
बंदरावरच्या या पेट्रोलपंपाच्या आवारातून पितळीची टाकी चोरून नेताना चोरटे येथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले. 25 मे रोजी दुपारी 3 वा. च्या सुमारास ही चोरी झाली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज सोसायटीच्या पदाधिकार्यांना दिसून आले. त्यानंतर या चोरीची शहर पोलिसांकडे लेखी तक्रार झाली. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या चोरट्यापैकी एकजण पुन्हा पेट्रोलपंपाजवळ आला असता त्याला सोसायटीच्या पदाधिकार्यांनी पकडले. ही माहिती अशा चोर्यांमुळे हैराण झालेल्या मच्छीमारांना कळल्यानंतर ते सोसायटीच्या कार्यालयाजवळ आले आणि त्या चोरट्याला बाहेर आणून चोप दिला. त्यावेळी त्यांनी आपले नाव सलमान डॉन असल्याचे सांगितले.
मच्छीमारांकडून चोप दिला जात असताना त्याच्या साथिदारांची नावे विचारून घेण्यात आली. यामध्ये त्याने सरजील, अरमान, जुनैद अशा साथिदारांची नावे सांगितली. त्याचवेळी त्यांने चोरलेला माल गुरुनामक व्यक्तीला आणि रामआळीतील भांड्याच्या दुकानात विकतो अशी माहिती दिली. हे चोरटे मिरकवाडा गावातीलच आहेत. 26 मे च्या सकाळी हा प्रकार झाल्यानंतर साथिदारांचा शोध सुरु झाला. रात्रीच्यावेळी पहिल्या चोरट्याच्या साथिदारांमधील दोघेजण पुन्हा सोसायटीच्या पेट्रोलपंपाजवळ घुटमळत असल्याचे दिसून आले. त्यांनाही मच्छीमारांनी पकडून जवळच्या मलबारी जेटीवर नेऊन चोप दिला.
मलबारी जेटीवर दोघां चोरट्यांना मारहाण होत असल्याची माहिती राजीवडा महिला मच्छीमार तालुका सोसायटीच्या पदाधिकार्यांनी शहर पोलिस ठाण्यात फोन करून दिली. मोठा जमाव असल्याने तातडीने पोलिसांना पाठवा असे सांगण्यात आले. परंतू पोलिसांना यायला वेळ झाल्याने तोपर्यंत चोरट्यांची पिटाई सुरुच होती.