रत्नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कललगत पडलेल्या खड्ड्यांची समस्या दरवर्षी पावसाळ्यात त्रासदायक ठरत असून, नगर परिषद प्रशासनाला त्यावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. त्यात मारुती मंदिर ते माळनाका दरम्यानच्या रस्त्याची झालेली खड्डेमय दुरवस्थेमुळे गाड्यांची आदळआपट होत असल्याने नागरिकांमधून तीव्र भावना व्यक्त होत आहेत.
शहरातील प्रमुख तीन मार्गावरील रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे साळवीस्टॉप ते मारुती मंदिर, मारुती मंदिर ते नाचणे आणि मारुती मंदिर ते मजगावरोड चाररस्त्यापर्यंतचे खड्ड्यांचे प्रश्न सुटले आहेत. परंतु, पावसाळ्यात दरवर्षी मारुती मंदिर सर्कल लगत एकाच ठिकाणी सातत्याने खड्डे पडत आहेत. यंदाही पावसाळ्यात या ठिकाणी तीन ते चार मोठे खड्डे पडले असून, चारचाकी गाड्याही यात आपटत आहेत. त्यामुळे आपसूकच चालकाच्या तोंडी प्रशासनाविरोधात ‘ओव्या’ बाहेर पडत आहेत.
मारुती मंदिरपासून जेलरोडपर्यंत काँक्रिटीकरणापूर्वी डांबरीकरणाचा पट्टा मारण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या मोठ्या पावसात या ठिकाणी खड्डे पडून खडी रस्त्यावर पसरली होती. त्यानंतर नागरिकांना होणारा त्रास जाणवून ठेकेदारांनी पुन्हा डांबरीकरणाचा पट्टा मारला. परंतु सलग तीन दिवस पडणार्या मोठ्या पावसात पुन्हा खड्डे पडले आहेत. यातून बारीक खडी बाहेर आल्याने दुचाकीस्वाराने ती त्रासदायक ठरत आहे.
याभागात काँक्रिटीकरणाचे काम सुरु व्हायचे आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यावर खड्ड्यांचा प्रश्न सुटेल अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे. पुढील पावसाळ्यात हा खड्ड्यांचा प्रश्न राहणार नाही असेही अधिकार्यांनी सांगितले.
मात्र, सध्या मारुती मंदिर ते माळनाका दरम्यान छोटे-छोटे खड्डे पडून रस्त्यांची चाळण झाली आहे. याचा सर्वाधिक धोका दुचाकीस्वरांना बसत आहे. बाहेर आलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचा धोका वाढला आहे. छोट्या खड्ड्यांमधून वाहने धक्के खात पुढे जात आहेत. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्यावर खड्डे बुजवण्याची मागणी होत आहे.