मारुती मंदिर येथे विनाकारण फिरणाऱ्या 142 जणांची अँटीजेन टेस्ट; पाचजण पॉझिटिव्ह

रत्नागिरी:- 15 दिवसांचे लॉकडाऊन जाहीर होताच बिनकामाचे फिरणार्‍या हौशा-नवश्यांना प्रशासनाने चांगलाच दणका दिला आहे. मारुती मंदिर येथे दिवसभरात 142 जणांची प्रशासनाने कोरोना तपासणी केली असून त्यामध्ये 5 जण पॉझिटीव्ह सापडले आहेत.

कोरोनाची चेन ब्रेक करण्याकरिता शासनाने 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला. यावेळी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बिनकामाचे घरातून बाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांसह पोलिसांनीदेखील रत्नागिरीकरांना केले होते. कामाशिवाय बाहेर फिरणार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा प्रशासनाने दिला होता.

वारंवार बजावूनसुद्धा नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यांना रत्नागिरीत मारुती मंदिर येथे अडवून त्यांची तपासणी केली जात आहे. त्यामध्ये परजिल्ह्यातून आलेल्या वाहनधारकांचाही समावेश आहे. त्यांची वाहने ताब्यात घेऊन लगेच कोरोना चाचणी केली जात आहे. दिवसभरात रत्नागिरी 142 जणांची पोलिसांनी अँटिजेन चाचणी घेतली. त्यात 5 जण कोरोनाबाधित आढळले आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात महत्त्वाच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महामार्गावरून जिल्ह्यात येणाऱ्यांची विशेष तपासणी नाक्यावर तपासणी केली जात आहे. मुंबईहून जनशताब्दी एक्स्प्रेसमधून सुमारे शंभर प्रवासी आज सकाळी रत्नागिरी स्थानकात उतरले. पण स्थानकावर असलेल्या कक्षात केवळ 13 जणांनी नोंदणी केली आहे.