रत्नागिरी:- घरातील माणसे वारंवार आजारी पडतात. औषध उपचार करुनही काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे तुम्हाला घर शुद्धीकरण करावे लागेल, असे सांगून घरात शुद्धीकरणासाठी येवून घरात जादूटोणा करुन घरातील महिलांचे सुमारे दिड लाख रु.चे दागिने शुद्धीकरणासाठी घेवून जाऊन विलस शंकर तांबे (वय ५२ ,रा. भावेआडम, रत्नागिरी) यांची फसवणूक करणार्या भोंदू बाबा मुश्ताक इसा काझी (वय ५२, रा.मजगाव) याला येथील न्यायालयाने १ वर्ष कारावास व १ हजार रु.दंडाची शिक्षा ठोठावली.
रत्नागिरी तालुक्यातील भावेआडम येथे राहणारे विलास तांबे यांच्या घरातील काही व्यक्ती सातत्याने आजारी पडत होत्या. औषध उपचार केल्यानंतरही त्यांना अपेक्षित गुण येत नव्हता. याच संधीचा फायदा मजगाव येथील भोंदू बाबा मुश्ताक काझी याने उठवला होता. दि. २८ एप्रिल ते १० ऑक्टोबर २०१६ या कालावधित मुश्ताक काझी हा तांबे यांच्या भावेआडम येथील घरी आला होता. त्याने घरातील माहिती घेतल्यानंतर तुम्हाला घर शुद्धीकरण करावे लागेल असे श्री.तांबे यांना सांगितले होते. त्यानुसार त्याने घरात येवून घरातील सदस्यांच्या अंगावरुन नारळ, लिंबू, लाल कपडा, मुर्ती आदी साहित्या काढून देवदेवस्कीचा प्रकार केला होता. याच दरम्यान त्यांने घरातील महिलांचे वापराचे दागिनेही शुद्धीकरण करावे लागतील असे सांगितले. त्यानुसार घरातील महिलांचे सुमारे दिड लाख रु.किमतीचे ४ मंगळसुत्र,४ चेन, २ कानातील कुड्या व साखळी व रोख रु.१ हजार ५०० असे घेवून गेला होता.
मुश्ताक काझी घेवून गेलेले दागिन शुद्धीकरण करुन परत देईल अशी आशा तांबे कुटुंबियांना होती. मात्र दि. १८ जुलै २०१७ पर्यंत त्यांने दागिने परत न दिल्याने अखेर विलास तांबे यांनी ग्रामीण पोलीसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ग्रामीण पोलीसांनी भा.द.वि.क.कलम ४२० , जादुटोणा अधिनियम २१३ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर मुश्ताक काझी याला दि. ९ ऑगस्ट २०१७ ला अटक करण्यात आली होती. तपास पुर्ण झाल्यानंतर पोलीसांनी मुश्ताक काझी याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले होते. शनिवारी या घटल्याची सुनावणी पुर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी मुश्ताक काझी याला भादंविक कलम ४२० अन्वये १ वर्ष साधा कारावास व ५०० रु दंड, दंड न भरल्यास ४ दिवस साधा कारावास, जादूटोणा अधिनियम २०१३ चे कलम ३ अन्वये १ वर्ष साधा कारावास व ५०० रु दंड, दंड न भरल्यास ४ दिवस साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली.
ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक श्री. मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ एस.एल.पेंढामकर यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. पैरवी अधिकारी सपोनि डी. बी. सूर्य,सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनंत जाधव , पोहवा संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.