रत्नागिरी:- दोन दिवसांसाठी 4 हजार 500 रुपयांच्या भाडे तत्वावर दिलेले सुमारे 1 लाख 6 हजार 110 रुपयांचे कॅनन कंपनीचे दोन कॅमेरे परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास पालकर स्टॉप परटवणे येथे घडली.
विक्रांत महादेव शेडगे (रा.विरेश्वर कॉलनी,चिपळूण) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याच्याविरोधात पंकज प्रकाश रसाळ (23,रा.परटवणे,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार, पंकज यांचा फोटोग्राफीचा व्यवसाय आहे व ते आपले कॅमेरे भाड्यानेही देतात.याबाबत त्यांनी ओएलएक्स या अॅपवर ऑनलाईन जाहिरातही दिली आहे. ही जाहिरात वाचून विक्रांतने 13 डिसेंबर रोजी पंकजला फोन केला आणि त्याच्याकडील कॅमेर्यांची माहिती घेउन आपल्याला दोन कॅमेरे भाड्याने पाहिजे असल्याचे सांगितले.त्यानुसार, 14 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वा.सुमारास पंकज आपला चुलत भाउ शुभम रसाळ सोबत दोन कॅमेरे व तीन लेन्स घेउन परटवणे येथील पालकर स्टॉपजवळ विक्रांतला भाडे तत्वावर देण्यासाठी गेला.
काही वेळाने विक्रांत आपल्या स्वीफ्ट कारने तिथे आला आणि त्याने आपण ट्रॅव्हल फोटोग्राफर असून कोल्हापूर येथे फोटोग्राफीसाठी जाणार असल्याचे पंकजला सांगितले. तसेच कॅमेरा परत करतानाच पैसे देण्याचे कबूल केेले.त्यानंतर त्याने आपण आपले आधार कार्ड,लाईट बिल आणि शंभर रुपयांचा बाँड आणला असल्याचे सांगून त्यावर स्वहस्ताक्षरात दोन कॅमरे पंकज रसाळकडून भाडे तत्वावर घेत असल्याचे लिहून व सही करुन पंकजला दिला.त्यामुळे पंकजने विश्वसाने विक्रांतला दोन कॅमेरे दिले. परंतू दोन दिवस झाल्यानंतर ही विक्रांत न आल्याने पंकजने त्याला फोन केला तेव्हा मला यायला उशिर होईल असे त्याने सांगितले.17 डिसेंबर रोजीही विक्रांत न आल्याने पुन्हा त्याला फोन केला तेव्हा त्याचा फोन बंद लागला.म्हणून पंकजने चिपळूणला विक्रांत रहात असलेल्या ठिकाणी जाउन चौकशी केली तेव्हा तो पत्ताही खोटा निघाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पंकजने गुरुवारी दुपारी शहर पोलिसांकडे तक्रार दिली.