भाट्ये पुलावर तरुणाचा लटकलेल्या स्थितीत आढळला मृतदेह; एकच खळबळ

रत्नागिरी:-शहरानजिक भाट्ये पुलावरच तरुणाने गळफास घेतल्याची घटना शनिवारी सकाळी समोर आली. पुलावर लटकलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुलाला लटकलेला मृतदेह पाहून अनेकांच्या काळजात धस्स झाले. रत्नागिरीनजीकच्या मिऱ्या येथील गुरुनाथ सखाराम पाटील असे या तरुणाचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे.

रत्नागिरी शहरातून पावसकडे जाण्याच्या मार्गावर भाट्ये येथे खाडीवर पूल आहे. हा मार्ग नेहमीच गजबजलेला असतो. शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास येथे गुरुनाथ पाटील याने गळफास लावून घेतला आणि पुलावरुन उडी मारली. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. हे वृत्त कळताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली आहे. गुरूनाथची दुचाकी पुलावर होती. तो वॉचमन म्हणून काम करतो.

भाट्ये खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनी तो मृतदेह प्रथम पाहिला. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी मृतदेह पुलावर घेत विच्छेदनासाठी रुग्णालयाकडे पाठवला आहे. पुलावरुन खाडीत उडी मारुन आत्महत्या करण्याचे प्रकार याआधी घडले आहेत. मात्र पुलाला गळफास लावून घेण्याचा प्रकार प्रथमच घडला आहे.