बीडीओंच्या वाहनासह अन्य एका वाहनाला धडक; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे बोलेरो पिकअप गाडी चालवून पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांच्या तसेच अन्य एका वाहनाला धडक देत अपघात केला. याप्रकरणी पूर्णगड पोलिस ठाण्यात बोलेरो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शनिवार 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.35 वा. सुमारास फिनोलेक्स फाटा ते गोळप ब्रिज उतारात घडली.

मनोहर नारायण सावंत (25, रा. जेल कॉटर्स, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित बोलेरो चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात मिलिंद नारायण कारकर (47, रा. फगरवठार, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांच्या वाहनावर चालक म्हणून नोकरी करतात. शनिवारी सायंकाळी ते आपल्या ताब्यातील बोलेरो (एमएच- 08 -एएफ-0318) घेउन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातून एस.एस.टी पॉईंट गावखडी येथे सोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी ओंकार सरनाईक यांना घेउन फिनोलेक्स फाटा ते गोळपमार्गे गावखडी असे जात होते. गोळप ब्रिजवर उतारात येण्यापूर्वी तेथे झालेल्या अपघाताचे ठिकाणी नागरिक व वाहने रस्त्यावर उभी असल्याने फिर्यादी मिलिंद कारकर यांनी आपल्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या डाव्या बाजुला थांबवले होते. त्यांच्या पुढे एक टाटा सुमो गाडीही थांबलेली होती.

त्यावेळी संशयित आरोपी मनोहर सावंत आपल्या ताब्यातील बोलेरा पिकअप (एमएच- 08-एक्यु- 800) याने पाठीमागून येउन फिर्यादीच्या गाडीला धडक दिली. त्यामुळे त्यांची गाडी पुढील सुमोला धडक बसल्याने तीन्ही वाहनांचे नुकसान झाले.