रत्नागिरी:- मागील सलग तीन दिवस रत्नागिरीत ढगाळ वातावरण होते. त्याचा परिणाम आंबा पिकावर झाला असून तुडतुडा आणि बुरशीमुळे शेवटच्या टप्प्यातील आंब्याला फटका बसला आहे. मोहोरातून फळधारण होण्याच्यावेळीच तुडतुडा पडल्याने त्यामधून उत्पादन मिळणेच अशक्य आहे. कोकणातून वाशी बाजारात पेटीच्या पेटी जात असतानाच बागायतदारांना शेवटच्या टप्प्यातील उत्पादनांची चिंता लागून राहिली आहे.
विदर्भासह आजुबाजूच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने शेतीला धक्का दिला आहे. तशी परिस्थिती कोकणात नसली तरीही पावसाळी वातावरणामुळे निर्माण होणार्या रोगांनी आंबा बागायतदार त्रस्त झाले आहेत. त्याला सामोरे जाताना बागायतदारांची त्रेधातिरपीट उडालेली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात पारा 40 अंशावर गेल्यामुळे फळगळीचे संकट होते. दक्षिणेकडील बागांमधील आंब्याची मोठ्याप्रमाणात गळ झाली. त्यानंतर गेल्या चार दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावली, पण त्या जोर नव्हता. तरीही सकाळी, सायंकाळी ढगाळ वातारवण होते. त्याचा परिणाम घनदाट आणि मोठ्या झाडे असलेल्या बागांना बसला आहे. राजापूरसह रत्नागिरी तालुक्यातील पावससह आजुबाजूच्या परिसरातील बागांमध्ये तुडतुड्यांचा प्रचंड प्रादुर्भाव झालेला आहे. फळधारणा झालेल्या झाडांवर बुरशी पडली असून बारीक फळं गळून गेली आहेत. पहिल्या टप्प्यातील आंबा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार आहे. सध्या वाशी बाजारात सरासरी 50 हजार पेट्या महाराष्ट्रासह अन्य राज्यातून येत आहेत. त्यातील देवगडमधून सर्वाधिक 60 टक्के तर रत्नागिरीतून 20 टक्के आंबा जात आहे. उर्वरित आंबा कर्नाटक, आंध्रसह अन्य राज्यातील आहे. रत्नागिरीतून कमी पेटी आंबा जात आहे. सुरवातीचा आंबा कमी असल्यामुळे शेवटच्या टप्प्यात तरी चांगले पिक हाती येईल अशी आशा बाळगून बागायतदार आहेत. बिघडलेल्या वातावरणामुळे त्यांची पंचाईत झाली आहे. अखेरचा आंबा व्यवस्थित येईल की नाही अशी दोलायमान अवस्था निर्माण झालेली आहे. यावर कॅनिंगचे भवितव्य अवलंबून असते. अन्यथा परराज्यातील आंब्यावर प्रक्रियेसाठी अवलंबून राहावे लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे.