लांजा:- लांजा तालुक्यातील चाकरमानी तरुणाला मुंबईची दादागिरी महागात पडली आहे. बस वाहकाशी हुज्जत घालण्याचा प्रकार त्याच्या अंगलट आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने न्यायालयाने दिलेल्या सुनावणीत एक वर्षाचा कारावास, 3 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विनय उर्फ शाखा प्रशांत तांबे (वय 27, रा. सोल्ये, ता. लांजा) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तरुण आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, तिकीटावर नाव व बॅच नंबर आहे, असे सांगितल्याच्या रागातून एसटी बसच्या वाहकाला विनय याने मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. ही घटना 8 फेब्रुवारी 2020 या दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास सोल्ये ते जांभळतिठा येथे घडली.
राजापूर एसटी डेपोचे लोकसेवक एसटी वाहक सुरज सुभाष ठिक हे राजापूर आगारातून एसटी (क्र. एमएच-20 बीएल 0458) राजापूर ते जांभवली असे जात असताना एसटी दुपारी तीनच्या सुमारास सोल्ये-जांभळतिठा येथे आली असता. जांभळतिठा येथे उतरणारे प्रवासी आरोपी मुंबईस्थित चाकरमानी तांबे याने वाहक ठिक यांच्याकडे नावाची चौकशी केली. त्यांनी आरोपीला तुमच्या तिकिटावर माझे नाव व बॅच नंबर आहे असे सांगितले. याचा राग मनात धरुन ठिक यांना शिवीगाळ करुन शर्ट पकडून चेहऱ्यावर मारहाण केली व सिटवर ढकलून दिले. या प्रकरणी सुरज ठिक यांनी राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी भादवी कलम 332 अन्वये गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक एम. एम. वालावलकर करत होते.
शनिवारी 17 सप्टेंबर रोजी या खटल्याचा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे आठ साक्षिदार तपासण्यात आले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲड. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपी विनय तांबे याला एक वर्षाचा साधा कारावास व तीन हजार रुपयांचा दंड, दंड न भरल्यास एक महिना साधा कारावाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून राजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल किरण सपकाळे यांनी काम पाहिले.