खेड:- स्टेट बँक ऑफ इंडियाचा अधिकारी बोलतोय अशी बतावणी करत खेड तालुक्यातील लोटे येथील एका महिलेच्या बँक खात्यातील ९७ हजार रुपयांची लुबाडणूक करण्यात आली आहे. महिलेच्या पतीने खेड पोलिसात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात भामट्याच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल केला आहे.
लोटे येथील कांचन रामचंद्र चाळके यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा फोन आला. फोन करणाऱ्याने आपण स्टेट बँक ऑफ इंडियातुन बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड अपडेट करण्यासाठी मोबाईल आलेला ओटीपी विचारला. कांचन चाळके यांनी त्या अनोळखी इसमांस ओटीपी सांगताच त्यांच्या बँक खात्यातून ९७ हजार २०० रुपये काढून घेण्यात आले. आपल्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढण्यात आल्याचा मेसेज कांचन चाळके यांच्या मोबाईलवर आल्यावर आपण फसलो गेल्याची कांचन यांना कल्पना आली. त्यांचे पती रामचंद चाळके यांनी याबाबत खेड पोलिसात तक्रार दाखल केल्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल केला. गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारे गृहिणींना लुबाडण्याचा प्रकार सातत्याने घडत आहेत. एकाद्या अनोळखी व्यक्तीचा फोन आला आणि त्याने बँकेच्या संबंधित काही चौकशी करायला सुरवात केली तर त्या व्यक्तीला बँक खयाबाबत कोणतीही माहिती देऊ नका असे आवाहन वारंवार पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र पोलिसांच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने महिलांना ऑनलाईन लुबाडण्याचा प्रकार सर्रासपणे सुरु आहेत.