प्रत्येक तालुक्यात एक क्षयरुग्ण अधिकाऱ्यांकडून दत्तक

रत्नागिरी:- राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक अशा 9 रुग्णांना अधिकारी व कर्मचार्‍यांनी दत्तक घेतले आहे. यांना पोषण आहाराचे वितरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्रीय क्षयरोग विभागामार्फत प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियानांतर्गत क्षयरुग्णांना दर महिन्याला पाचशे रुपये रुग्णांच्या खात्यावर जमा केले जातात.  परंतु, ही मदत अत्यंत अल्प असून, याखेरीज अन्न पुरवठा व इतर सुविधा सहकार्य देणे आवश्यक आहे. जेणेकरुन रुग्णांची प्रकृती तत्परतेने पूर्ववत होण्यास मदत होईल.
त्या अनुषंगाने केंद्रीय स्तरावरुन निक्षय मित्र होऊन रुग्णांना सहकार्य करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय टी. बी. फोरम सभेमध्ये जिल्हाधिकारी यांनी देखील सर्व खासगी औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था, दानशूरव्यक्ती यांना जास्तीत जास्त निक्षय मित्र होण्यासाठी आवाहन केले होते.

या आवाहनानुसार जिल्ह्यातील एकूण नऊ अधिकारी व कर्मचारी यांनी तालुक्यातील काही क्षयरुग्ण दत्तक घेतले आहेत. त्यांच्यामार्फत रुग्णांना उपचार सुरु असेपर्यंत पोषक आहार पुरविला जाणार आहे. सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी तालुक्यातील एका क्षय रुग्णाला दत्तक घेतले आहे. या दत्तक घेतलेल्या क्षयरुग्णाला जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत पोषक आहाराचे प्रत्यक्ष वाटप करण्यात आले.

जिल्ह्यातील सर्व दानशूर व्यक्ती, औद्योगिक संस्था, सामाजिक संस्था यांना निक्षय मित्र होऊन क्षयरुग्णांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच निक्षय मित्र संबंधित अधिक माहितीकरीता जिल्हा क्षयरोग केंद्र, रत्नागिरी येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी केले आहे.