रत्नागिरी:- पावसाळ्याच्या दिवसात असे काही दिवस असतात ज्यावेळी समुद्राला मोठे उधान येते. त्याचवेळी जर मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू असेल तर समुद्र किनाऱ्यासोबतच खाडी किनाऱ्यावरील वस्त्यांनाही त्याचा फटका बसण्याची शक्यता असते. यंदाच्या पावसाळ्यात समुद्रामध्ये 26 वेळा मोठे उधान येणार असल्याची माहिती प्रादेशिक बंदर विभागाने दिली आहे.
पावसाळ्यात जून महिन्यात 6 वेळा, जुलै महिन्यात 7 वेळा, ऑगस्ट महिन्यात 7 वेळा आणि सप्टेंबर महिन्यात 6 वेळा मोठे उधान येणार आहे. जूनमध्ये मंगळवार दि. 14 जून पासून शनिवार दि. 18 जून हे सलग 5 दिवस मोठ्या भरतीचे असून याकालावधीत 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा समुद्रात उठणार आहेत. तर 30 जून रोजीही दुपारी मोठी भरती येणार असून दोन मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठतील असा अंदाज आहे. जुलै महिन्यामध्ये बुधवार दि. 13 जुलै ते रविवार दि. 17 जुलै या कालावधीत मोठी भरती येणार आहे. या काळात समुद्रात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उठणार आहेत. तसेच 30 व 31 जुलै हे दिवसही मोठ्या भरतीचे असणार आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुवार दि. 11 ऑगस्ट ते सोमवार दि. 15 ऑगस्ट या काळात मोठी भरती येणार आहे. याही कालावधीत 2 ते सव्वादोन मीटर उंचीच्या लाटा उसळतील. तसेच दि. 29 व 30 ऑगस्ट या दिवशीही मोठी भरती असणार आहे. सप्टेंबर महिन्यात शुक्रवार दि. 9 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर हे मोठ्या उधानाचे दिवस असून याकाळात 2 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या उधानाच्या काळात समुद्राच्या आणि खाडीच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी याकाळात दक्ष राहून होणाऱ्या जीवित व वित्त हानीपासून संरक्षण करणे गरजेचे आहे.
बंदर विभागामार्फत या काळात बंदरात धोक्याची सूचना देारा बावटा लावला जातो. तसेच या काळात मच्छिमारांनी तसेच नागरिकांनी समुद्रात जाऊ नये असाही इशारा देण्यात आला आहे.