रत्नागिरी:- रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरुन पानवलजवळ एका दुचाकीस्वारावर अचानक बिबट्याने झडप घातली. मात्र सुदैवाने तो दुचाकीस्वर बालंबाल बचावला. ही खळबळजनक घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे दुचाकी चालक सचिन बेंद्रे यांची भंबेरी उडाली होती. बेंद्रे हे सकाळी रत्नागिरीत कामानिमित्ताने आले होते. त्यांना काम आटपून घरी जाण्यास सायंकाळी उशीर झाला होता. मित्रांची भेट घेऊन रात्री ते जाकादेवीकडे रवाना झाले. त्यांची दुचाकी पानवल येथील चांदसूर्या वळणावरुन पुढे जात होती. त्याचवेळी बिबट्याने उडी मारली. बेंद्रे यांच्या गाडीपाठोपाठ चारचाकी गाडी येत होती. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे सर्वांची गाळण उडाली होती. लोकांचा राबता दिसल्यामुळे बिबट्या तेथून पळून गेला. सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. बेंद्रे यांच्यासह सर्वजणं घरी निघून गेले. चांदसुर्या हा भाग महामार्गावरच असल्यामुळे वाहनांची ये-जा असते. त्या ठिकाणी काळोख असतो. बाजूलाच जंगल भाग असल्यामुळे कोणताही प्राणी रस्त्यावर आला तर त्याचा अंदाज येत नाही. दरम्यान, या परिसरामध्ये आठ दिवसांपुर्वी स्थानिक लोकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. या परिसरात वास्तव्य असल्यामुळे ग्रामस्थांमध्य भितीचे वातावरण आहे.