चिपळूण:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील एकेरी मार्ग पूर्णत्वास गेला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या अखेरीस घाटातून एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू झाली आहे.
चिपळूणच्या हद्दीत असलेल्या घाटात दोन्ही बाजूच्या सरंक्षक भिंतीसह कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. मात्र महाड हद्दीतील सरंक्षक भितींचे कामे बाकी आहे. पावसाळ्यात या भागात धोक्याची शक्यता असून त्यासाठी ठेकेदार कंपनीकडून उपाययोजनाही केल्या आहेत. तीन वर्षापासून परशुराम घाटातील चौपदरीकरणासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. एकीकडे २२ मीटर उंचीची दरड आणि दुसरीकडे खोल दरी व पायथ्याला गाव असल्याने अतिशय कठीण परिस्थितीत येथे काम करावे लागले. खेड हद्दीत कल्याण टोलवेज व चिपळूण हद्दीत ईगल इन्फ्रा कंपनीमार्फत काम सुरू आहे. परंतू घाटातील डोंगर कटाईच्या कामातच वर्षभराचा कालावधी निघून गेला. त्यानंतर दरडीच्या बाजूने सरंक्षक भिंत व चौपदरीकरणातील कॉक्रिटीकरणाचे कामही टप्प्याटप्प्याने करण्यात आले. त्यातील एकेरी मार्ग पूर्णत्वाकडे गेला असून उर्वरीत कॉंक्रिटीकरणाचे कामही मार्गी लागले आहे. आता दुसऱ्या मार्गावर कॉंक्रिटीकरणाचे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे.
गेल्या काही महिन्यापासून परशुराम घाटात मध्यवर्ती ठिकाणी असलेला कातळाचा भाग दोन ब्रेकरच्या साहाय्याने तोडण्याचे काम सुरू आहे. बहुतांशी कातळ तोडला असला तरी अद्याप रस्त्याचा मार्ग मोकळा झालेला नाही. तसेच गटार व संरक्षक भिंतीचे कामही शिल्लक आहे. त्यातच आता पावसाळा येऊन ठेपल्याने चौपदरीकरणाची घाई सुरू झाली आहे. परंतू कातळ फोडण्यासाठी केवळ एकच ब्रेकर सद्यस्थितीत उपलब्ध आहे. त्यामुळे या कामाचा वेग मंदावला आहे. मध्यंतरी दहा दिवस परशुराम घाटातील वाहतूक दिवसातून ८ तास बंद ठेवण्यात आली होती. परंतू या कालावाधीत देखील खेड हद्दीतील कामाला अपेक्षित गती मिळाली नव्हती. त्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही चौपदरीकरणातील कामाला वेग देण्याच्या सूचना केल्या होत्या. परशुराम घाटात पावसाळ्यातील सुरक्षेच्या दृष्टीने ईगल कंपनीकडून ५ कामगार, ३ सुरक्षा कर्मचारी, २ हायवे इंजिनीअर, रात्रंदिवस पहारा देत आहेत . एखाद्या वेळेस दरड कोसळल्यास जेबीसी, पोकलेन, ग्रेडर व डंपरची व्यवस्था आहे. शनिवारी महाड हद्दीत असलेल्या परशुराम घाटात डोंगरातील काही दगड रस्त्यावर आले होते. मात्र त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. डोंगर कटाईनंतरच्या पहिल्याच पावसात दगड माती कोसळण्याचा धोका असल्याने दरडीच्या बाजूने एकेरी मार्गावरून वाहतूक सुरू ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.