रत्नागिरी:- पीएम किसान योजनेच्या नवव्या टप्प्याला आज प्रारंभ झाला. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यांतील शेतकर्यांशीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला. त्यात रत्नागिरीतील युवा आंबा उत्पादक देवेंद्र झापडेकर यांचाही समावेश होता.
सिव्हिल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा घेतलेल्या देवेंद्र झापडेकर यांनी आपल्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. सरकारी योजनेंतर्गत मँगो रायपनिंग चेंबरसाठी कर्ज मिळाले. बँक ऑफ इंडियाच्या रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील शाखेतील कर्ज घेतानाचा त्यांचा अनुभव चांगला असल्याचे त्यांनी पंतप्रधनांपुढे मांडले. त्यांच्या अनुभवातून बाकीच्या शेतकर्यांनाही प्रेरणा घेता येईल, असं पंतप्रधानांनी सांगितले. याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी झापडेरक यांना प्रश्न विचारत माहिती जाणून घेतली. आंबा उद्योगासाठी ते कसे प्रेरित झाले, यापासून ते यशस्वी कसे झाले इथपर्यंतची माहिती घेतली. झापडेकर हे आंबा प्रक्रिया उद्योग करतात. नैसर्गिकरित्या आंबा पिकवण्यासाठी पुर्वी 14 ते 15 दिवस लागत होते. किसान योजनेतून 16 लाख रुपये कर्ज घेतले आणि आंबा पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबर उभारले. त्यामुळे 4 ते 5 दिवसात आंबा पिकत आहे. दर्जेदार आंबा ग्राहकांना दिला जात आहे. कार्बाईड किंवा तत्सम अन्य पदार्थांचा आंबा पिकवण्यासाठी वापर नसल्यामुळे शरीराला अपायकारक नाही असे फळ दिले जात आहे. हापूसला दरही चांगला मिळत असल्याचे झापडेकर यांनी सांगितले.
सहा मिनिटांहून अधिक काळ चाललेल्या या संवादामधून झापडेकर यांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही आईची इच्छा पुरी करत स्वतः यशस्वी उद्योजक बनला आहात. शेतीमुळे एवढा मोठा बदल तुमच्यामध्ये झाला आहे. या प्रकल्पामुळे तुमच्या कुटूंबाचेच नव्हे तर सहकारी शेतकर्यांचेही भले केले आहे. तुम्ही राबविलेल्या प्रकल्पामुळे अन्य शेतकर्यांपुढे आदर्श दिला आहे. सहा वर्षांपुर्वी गरीब शेतकर्यांना कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. अनेक अडचणी येत होत्या. आता ती परिस्थिती बदलली आहे. शेतकर्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.