काळबादेवी, गोळपेत लागवड; पन्नास रुपये किलो बीज
रत्नागिरी:- पंतप्रधान मत्स्यसंपदा योजनेतून गोळप, काळबादेवी येथे राबविण्यात आलेल्या समुद्रशेवाळ लागवडी प्रकल्पातून ४५ दिवसात उत्पादन मिळणार आहे. चाळीस राफ्ट टाकण्यात आले असून सुमारे १० हजार किलो समुद्रशेवाळ मिळेल. ही शेवाळ बिज म्हणून अन्य गावात लागवडीसाठी प्रतिकिलो पन्नास रुपयांनी विक्री केली जाणार आहे.
महिला आर्थिक विकास महामंडळाने ग्रामीण भागातील महिला बचत सक्षमीकरणासाठी नवतेजस्वीनी उपक्रमांतर्गत मत्स्य संपदा योजनेमधून समुद्रशेवाळ लागवडीचा प्रकल्प हाती घेतला. पहिल्या टप्प्यात गोळप येथे ३० राफ्ट तर काळबादेवी येथे १० राफ्ट टाकले आहेत. लवकरच मिर्या, भाट्ये येथेही लागवड केली जाणार आहे. ‘कप्पाफिकस्‘ या जातीच्या समुद्रशेवाळीची लागवड केली आहे. चेन्नईतून बिच आणले असून महाराष्ट्रातील हा पहिला प्रयोग आहे. यासाठी सेट्रल मरीन फिशरी रिसर्च इन्स्टटयुटचे डॉ. अजय नाखवा यांचे मार्गदर्शन लाभले असून माविमचे जगन्नाथ वानखेडकर, अमरिश मेस्त्री, प्रविण पाटील यांच्या देखरेखेखाली राबविला जात आहे. गोळप येथे केलेल्या लागवडीत १० बाय १० मीटरचा एका चौकोनी राफ्टमध्ये ५० किलो शेवाळ टाकली आहे. ४५ दिवसांनी परिपूर्ण शेवाळ तयार होईल. एका राफ्टमधून २५० किलो उत्पादन मिळते. दोन ठिकाणी टाकलेल्या ४० राफ्टमधून १० हजार किलो उत्पादन अपेक्षित आहे. १५ मेपर्यंत ते हाती येईल. ते ५० रुपये किलोने विक्री केले जाणार आहे. चेन्नईत समुद्रशेवाळचे बिच कमी असल्याने अन्य तिन गावात लागवडीसाठी गोळप, काळबादेवीत निर्माण झालेल्या समुद्रशेवाळीचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक गावातील 50 याप्रमाणे २०० महिलांना रोजगार मिळू शकतो. एका गावात ५०० राफ्ट टाकण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. उत्पादीत शेवाळीच्या मार्केटींगसाठी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्यामार्फत प्रयत्न सुरु आहेत.