निसर्ग वादळग्रस्त जि. प. शाळांच्या नुकसानीपोटी शासनाकडून तुटपुंजा निधी

रत्नागिरी:- निसर्ग चक्रवादळात जिल्ह्यातील 475 जिल्हा परिषद शाळांचे नुकसान झाले होते. त्यांच्या दुरूस्तीसाठी शिक्षण विभागाकडून 8 कोटी 30 लाख रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता; मात्र शासनाकडून फक्त 1 कोटी 30 लाख रूपये देण्यात आले आहेत.

जुन महिन्याच्या सुरवातीलाच जिल्ह्यात निसर्ग वादळाने हाहाकार माजवला होता. त्याचा सर्वाधिक फटका मंडणगड, दापोली आणि गुहागर तालुक्याला बसला होता. हजारो कोटी रुपयांचे नुकसान यामध्ये झाले. घरे, बागा, खासगी व सार्वजनिक कार्यालये उध्वस्त झाली होती. हजारो कोटींचे नुकसान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासूनच सर्व शाळा व माध्यमिक विद्यालये बंद आहेत. या कोरोनाचा सामना करत प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. वादळामध्ये अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या इमारतींची पडझड झाली होती. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष सुरू झालेले नव्हते. दोनच दिवसांपुर्वी शिक्षण विभागाकडून शाळा सुरु करण्याची तयारी करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शाळांची दुरूस्ती तातडीने करणे अत्यावश्यक आहे.
निसर्ग चक्रीवादळात जिल्ह्यातील 475 शाळांचे नुकसान झालेले होते. काही शाळांचे पत्रे, कौले, छप्पर उडून गेले तर काहींच्या भिंती कोसळल्या आहेत. शैक्षणिक साहित्यासह डिजीटल क्लासरूमची पाण्यामुळे वाताहत झाली आहे. या शाळांच्या दुरूस्तीसाठी 8 कोटी 62 लाखाचा निधी आवश्यक आहे, असा प्रस्ताव शासनाकडे शिक्षण विभागाकडून पाठविण्यात आला होता. गेल्या आठवड्यात शिक्षण विभागाला 1 कोटी 30 लाख रुपये निधी मिळाला. झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी प्राप्त निधी अपुरा पडणार आहे. शासनाच्या आदेशानुसार शाळा सुरू झाल्या तर वादळग्रस्त भागातील मुलांना बसवायचे कुठे हा प्रश्‍न निर्माण होणार आहे.