निर्यातीच्या आंब्याला विमा संरक्षणाचे कवच

रत्नागिरी:-आंबा निर्यातीला कोकणातून प्रोत्साहन मिळावे, यासाठी आता निर्यातीच्या आंब्याला विमा संरक्षण देण्याची तयारी पणनच्या प्रस्तावानुसार सुरू करण्यात आली आहे. याची धोरणे अद्याप निश्चित व्हायची असली तरी प्रायोगिक तत्त्वावर यासाठी रत्नागिरी आणि देवगडमधील हापूसला  प्राध्यान्य देण्याची प्राथमिक तयारी करण्यात आल्याची माहिती पणन महामंडळाच्या सुत्रांनी दिली.

कोरोना प्रादुर्भवाने आलेल्या अर्थ संकटाने मरगळलेली आंबा निर्यात पुन्हा नेटाने सुरू करण्यासाठी आता केंद्रीय कृषी मंत्रालयातर्फे निर्यातीच्या आंब्याला विमा संरक्षण देण्याची तयारी दर्शविली आहे.
या योजनेची अंमलबजावणी करताना त्याचा लाभ मँगोनेट प्रणालीवर नोंद केलेल्या सुमारे साडेचार हजार बागायतदारांना मिळणार आहे. मँगोनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील हापूस परदेशात निर्यात होत आहे. मँगोनेट अंतर्गत जास्तीत-जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करावी, यासाठी विमा योजनेचा पर्यायही वापरला जाणार आहे. यासाठी आतापर्यंत चार हजार 566 शेतकर्‍यांनी नोंदणी झाली आहे. नोंदणीकृत बागायतदारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
‘मॅगोनेट’ अंतर्गत निर्यातीच्या निकषांचे पालन करताना विविध अटींची पूर्तता करवी लागते. मात्र, निर्यात झाल्यानंतर तेथील हवामान, वातावरण या नैसर्गिक स्थितीबरोबर अपघातासारख्या तांत्रिकतेमुळेे नुकसान होऊ शकते. यासाठी निर्यात होणार्‍या उत्पादनाला विमा संरक्षण देण्याची तयारी करण्यात आली आहे.