निधी अभावी जिल्हा परिषदेची विकासकामे ठप्प

रत्नागिरी:-उपकरासह मुद्रांक करापोटी मिळणारे 6 कोटी जिल्हा परिषदेला अजुनही मिळालेले नाहीत. निधी अभावी प्रशासन कोंडित सापडले असून विकास कामे ठप्प झाली आहेत. शासनाकडून येणार्‍या निधीवरच अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहेत.

गेल्या आठवड्यात जिल्हा परिषद प्रशासनाने 2020-21 च्या अंतिम सुधारीत 27 कोटी 2 लाख 32 हजार 191 रुपयांच्या तर 2021-22 च्या 17 कोटी 11 लाख 45 हजार 138 रुपयांच्या मूळ अंदाज पत्रकाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली; मात्र शासनाकडून आलेला निधी जिल्हा परिषदेला  अजूनही प्राप्त झालेला नाही. हा निधी येईल, या आशेवर हे अंदाजपत्रक करण्यात आले आहे. 2020-21 च्या मूळ अंदाजपत्रकातील अपेक्षित अनुदान कोरोनामुळे मुद्रांक शुल्कासह सेसचा निधी अद्याप आलाच नाही. त्यामुळे प्रत्येक विभागाला पुरेशा तरतुदी करता न आल्यामुळे विकासकामांना निधीची प्रतिक्षाच करावी लागणार आहे. शासनाकडून 6 कोटी रुपये या उपकर व मुद्रांक शुल्कापोटी मिळतात. या निधीसाठी जि. प. कडून वारंवार राज्य शासनाकडे संपर्क साधण्यात येत आहे. त्याचबरोबर तसा पत्रव्यवहारही सुरू आहे. मात्र निधीसाठी तारखेवर तारीख मिळत आहे.हा निधी 10 मार्चला जमा होणार होता, मात्र झाला नाही. त्यानंतर शासनाने 15 मार्चपर्यंत निधी जमा होईल असे सांगितले, तोही झाला नाही. पुन्हा 25 तारीख दिली गेली, तीही उलटून गेली आहे. यामुळे निधीसाठी अद्यापही जि. प. ला प्रतीक्षा करावी लागत आहे.