ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा उडाला
रत्नागिरी:- ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार ठरविण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील विविध पक्षांची दमछाक होताना दिसत आहे. तालुक्यात शिवसेनेचे प्राबल्य असले तरीही नवे-जुने वादासह पक्षांतर्गत धुसफुस सुरुच आहे. भाजपसह राष्ट्रवादीनेही दंड थोपटल्यामुळे नाराजांना अन्य पक्षांतून रिंगणात उतरण्याची संधी मिळत आहे. शिक्षणाची अट आडवी आल्यामुळे काहींनी नोतवाईकांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
रत्नागिरी तालुक्यात 51 ग्रामपंचायतीची निवडणुक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. पत्ता कट होऊ नये यासाठी इच्छुकांनी फिल्डींग लावली आहे. सोमवारपर्यंत 104 अर्ज दाखल झालेले आहेत. ग्रामपंचायतींवर पक्षाचा शिक्का रहावा यासाठी शिवसेना, भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. विविध पक्षाचे पदाधिकारी उमेदवारांचा शोध घेत आहेत. अनेक ग्रामपंचायतींमध्ये उमेदवार मिळताना नाकीनऊ आली आहे. शिक्षणाची अट आडवी आल्यामुळे अनेक जुन्या जाणत्यांना निवडणुक रिंगणातून माघारी घ्यावी लागली. काहींनी नातेवाईकांना निवडणुक रिंगणात उतरवण्याची तयारी केली आहे. यावरुन गावागावात वादंग निर्माण झाले आहेत. तालुक्यातील बहूतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे प्राबल्य आहे. त्यामुळे इच्छुकांच्या रांगा लागलेल्या आहेत. गावातील ज्येष्ठ पुढारी सरंपचपदावर डोळा ठेवून पावले उचलताना दिसत आहेत. आरक्षण पडलेले नसल्यामुळे अनेक नेत्यांची अडचण झाली आहे. सुरवातीला नको नको म्हणणारे अखेरच्या टप्प्यात लोकांच्या आग्रहाखातर आम्ही निवडणूक लढवत असल्याचे सांंगत आहेत. नाराजांची समजूत काढताना नेत्यांची नाकी दम येत असून त्यांना पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. प्रत्येकजणं आपापली सोय कशी होईल याकडे लक्ष देत आहेत. गावागावात रंगलेली हा गोंधळ आज थंडावणार आहे.