नाटे येथे गोवा बनावटीचा दिड लाखांचा मद्यसाठा जप्त

राजापूर:-  राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने नाटे बांदकरवाडी येथे शुक्रवारी रात्री टाकलेल्या छाप्यात या ठिकाणाहून 1 लाख 58 हजार रुपये किमतीचे गोवा बनावटीचे मद्य जप्त केले आहे. त्याचबरोबर बेकायदेशीररीत्या मद्य विक्री करणार्‍या ईश्वरसिंग रामचंद्र बांदकर (वय 46) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, दुसर्‍या एका कारवाईत राजापुरातील हातिवले-जैतापूर मार्गावर गोवा मद्याची वाहतूक करणार्‍या कारमध्ये 1 लाख 58 हजार किमतीच्या मद्यासह 1 लाख 40 हजार रुपये किमतीची कारही जप्त केली. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेडगे यांनी रत्नागिरी जिल्हा भरारी पथकासह सर्व युनिटना कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यानुसार भरारी पथकाचे निरीक्षक अमित पाडळकर पथकातील सहकारी दुय्यम निरीक्षक जी. सी. जाधव, एस. बी. यादव, जवान मानस पवार, वैभव सोनावले, व्ही. के. भोसले, एस. टिकार, एन. जे. तुपे यांनी कारवाईला प्रारंभ केला आहे.

राजापूर तालुक्यातील नाटेतील बांदकरवाडी येथे सिमेंट पत्र्याच्या शेडमध्ये गोवा बनावटीच्या मद्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर भरारी पथकाने शुक्रवारी छापा टाकला. या कारवाईत बॉम्बस् लेमन होडका मद्याचे 22 बॉक्स सापडले. या बॉक्समध्ये 1056 बाटल्या मिळाल्या असून त्यांची किंमत 1 लाख 58 हजार 400 इतकी आहे. इतर 35 बाटल्या कापडी पिशवीमध्ये मिळाले असून यांची किंमत 5,250- इतकी आहे. कारवाईत मॅगडॉल नंबर 1 नामक व्हिस्कीच्या बाटल्या मिळाल्या असून त्याची किंमत 17,280- इतकी आहे. या प्रकरणी ईश्वरसिंग रामचंद्र बांदकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.