रत्नागिरी:- शहरातील राजीवडा येथील नवविवाहितेच्या छळ प्रकरणी केलेल्या तक्रारीच्या चौकशीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्याने शहर पोलिसांनी पतीसह दीर, सासू-सासरे, नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माहेरहून सोन्याच्या दागिन्यांसह जमीन नावावर करण्याचा तगादा लावून मारहाण केली जात असल्याची तक्रार आयशा शाहरुख बुड्ये या नवविवाहितेने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी चौकशी करुन पाच जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.
राजीवडा गावातच राहणार्या आयशा बुड्ये हिचा विवाह 2 एप्रिल रोजी झाला. विवाहानंतर लगेचच माहेरहून सोन्याचे दागिने आण आणि आजोबांची जमीन नावावर करुन देण्यास पती शाहरुख बुड्येकडून सांगितले जात होते. या मागणीला दीर मुबीन बुड्ये, सासरे शौकत बुड्ये, सासू आस्मा बुड्ये, नणंद अलमास बुड्ये यांच्याकडून पाठिंबा दिला जात होता. घरात वावरताना स्वातंत्र्य नव्हते. मोबाईलही काढून घेण्यात आला होता, अशी तक्रार काही दिवसांपूर्वी नवविवाहिता आयशा बुड्ये हिने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे केली होती.
पोलिस अधीक्षकांकडे केलेली तक्रार शहर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आली. याप्रकरणी चौकशी केल्यानंतर नवविवाहितेच्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीर मुबीन सतत माहेरहून किती सोने आणलेस असे हिणवत सोने घेऊन ये असे सांगत होता. सासू आस्मा बुड्ये संसाराला लागणारे फ्रीज, कपाट, टीव्ही, पलंग का आणले नाहीस म्हणत टोचून बोलत होती. दीर घरातील सर्व व्यवहार स्वत:कडे राहावेत यासाठी दमदाटी करीत होता. सासरे शौकत बुड्ये दीराची बाजू घेत होते अशा आशयाची तक्रार नवविवाहितेने केली होती.
सासू केस धरुन घराच्या मागील दरवाजात नेऊन आम्ही सांगतो तसे वागली नाहीस तर खाडीत ढकलून देऊ, अशी भीती दाखवत होती. यावेळी नणंद अलमास बुड्ये हिची मदत होत असल्याचेही तक्रारीत म्हटले होते. वेळेवर जेवणही दिले जायचे नाही. रमजान ईदच्या काळात माहेरी आलेल्या आयशा बुड्येने ही माहिती घरात सांगितल्यानंतर पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली होती. दरम्यान नवविवाहितेच्या सासरकडूनही पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करुन आजोबा अब्दुल बिजली खान यांनी फसवून अशिक्षित मुलीशी विवाह लावून दिला होता, असे म्हटले होते.