रत्नागिरी:- शहरातील शांतीनंगर येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलीसांनी अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या गांजा पुरवठा करण्यामध्ये १९ वर्षीय तरुणीचा समावेश असून प्रेरणा साठे (रा. मूळ कारंवाचीवाडी सध्या रा. माळनाका) या तरुणीसह मतिन डोंगरकर (३५ रा. मूळ कोकण नगर , सध्या माळनाका) या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर गांजा विक्री प्रकरणातील आरोपींची संख्या चार झाली आहे.
रत्नागिरीत गांजा येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शांतीनगर येथे आधीच सापळा लावला होता. गांजा घेऊन रत्नागिरीत येणार्यावर पोलीस नजर ठेवूनच होते. गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर पोलिसांनी अडवलेल्या रिक्षात प्रवीण परब आणि ओमकार बोरकर होते. त्यांच्याकडे आढळलेल्या आठ प्लास्टिकच्या पुरचुंडीमध्ये ५५ हजारांचे अमली पदार्थ आढळून आले. मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. तर त्यांची अमली पदार्थ असलेली रिक्षा सुद्धा पोलिसांनी जप्त केली होती.
दोघांकडे चौकशी केल्यानंतर गांजा पुरवठा करणार्या व्यक्ती अन्य असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलीसांनी दोघांकडून पुरवठादारांची माहिती काढली. यामध्ये १९ वर्षीय तरुणी गांजा पुरवण्याचा व्यावसाय करत असल्याच्या समजताच पोलीसांनाही धक्का बसला. प्रेरणा साठे (वय १९) हिचे मूळ् गाव कारवांचीवाडी येथील असून ती मतिन डोंगरकर याच्या सोबत माळनाका येथे एका इमारतीत भाड्याचा फ्लॅट घेवून राहत होती. तेथूनच दोघे गांजा मागवून त्याचा पुरवठा शहातील अन्य तरूणांना करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
१९ वर्षीय तरुणी गांजाची पुरवठादार असल्याचे पुढे आल्यामुळे तरुण पिढी या व्यावसायात अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. झटपट पैसे मिळविण्याचा नादात तरुण पिढी या व्यवसायात येत असल्याचे पुढे येत आहे.