दोन वर्षांनी रंगला थरार… जिल्ह्यात फुटल्या अडीच हजार हंड्या 

रत्नागिरी:- गोविंदा रे गोपाळा…चा उत्स्फुर्त नारा देत आणि डिजेच्या गाण्यांवर ताल धरत गोविंदांनी जिल्ह्यातील हंड्या फोडल्या. शुक्रवारी जिल्ह्यात दहीहंडी उत्सव स्पर्धेच्या रूपात साजरा करण्यात आला. रत्नागिरीतील हंड्या फोडण्यासाठी गोविंदांनी थर रचण्याचा प्रयत्न केला. साळवी स्टॉप आणि प्रमोद महाजन क्रीडा संकुल या ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमासाठी नागरीकांनी सर्वाधिक गर्दी केली होती. 

जिल्ह्यातल्या तब्बल अडीच हजार दहीहंड्या गोविंदांनी फोडल्या. डॉल्बीची धकधक आणि दह्याने माखलेल्या गोविंदांनी दहीकाल्याचा सण उत्साहात साजरा केला. 

दरवर्षी दहीहंडी उत्सव सण म्हणून साजरा करण्याची पध्दत आहे. या सणाचा फायदा घेण्यासाठी राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत असल्याने या सणाला मागील काही वर्षांपासून व्यापक स्वरूप प्राप्त झाले. दहीहंड्यांकरीता मोठ्या रकमेच्या बक्षीसांसह काही ठिकाणी चित्रपटसृष्टीतील ताºयांच्या उपस्थितीने मागील काही वर्षांपासून या सणाला ग्लॅमर प्राप्त झाले. न्यायालयाने निर्बंधांमध्ये शिथिलता आणल्यानंतर दहीहंडी उत्सवाचे स्पर्धेत रूपांतर झाले. मागील दोन वर्षे कोरोनात गेल्याने यावर्षी दहिहंडी उत्सवाला मोठे व्यापक स्वरूप प्राप्त झाले होते. 

शुक्रवारी दुपारी उशिरा शहरातील छोट्या-छोट्या दहीहंड्या फोडण्याच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. रामआळी, मारूतीआळी, गाडीतळ येथील छोट्या-छोटया हंड्या गोविंदा पथकांनी फोडल्या. सायंकाळी साडेसहा वाजता मारूती मंदीर येथे रत्नागिरीतील पहीली हंडी फुटली. यानंतर रत्नागिरीतील इतर हंड्या फोडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. 

 आठवडा बाजार येथे राष्ट्रवादी पुरस्कृत हंडी उभारण्यात आली होती. याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने या ठिकाणीही नागरीकांनी गर्दी केली होती. आ. सामंत आयोजित दहीहंडी यावर्षी प्रथमच प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे उभारण्यात आली होती. या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील नागरकांनी या दहीहंडी स्पर्धेलाही गर्दी केली होती. तसेच एसटी स्टॅण्ड, मारूती मंदीर, शिवाजी नगर आणि साळवी स्टॉप येथेही दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला.